वृत्तसंस्था/ रोम
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड जोकोव्हिच आणि ग्रीसचा स्टिफॅनोस सिटसिपेस यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. सर्बियाच्या जोकोव्हिचने एटीपी टूरवरील स्पर्धेत आपला 1000 वा विजय नोंदविण्याचा पराक्रम केला आहे.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोव्हिचने नॉर्वेच्या कास्पर रूडचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. एटीपी टूरवरील स्पर्धेतील जोकोव्हिचचा हा एक हजारावा विजयी सामना आहे. या स्पर्धेत जोकोव्हिचने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. टेनिस क्षेत्रामध्ये एटीपी टूरवरील 1000 सामने जिंकण्याचा पराक्रम करणारा 34 वर्षीय जोकोव्हिच हा पाचवा टेनिसपटू आहे. यापूर्वी असा विक्रम अमेरिकेचा जिमी कॉनर्स, स्वीसचा फेडरर, झेकचा इव्हान लेंडल आणि स्पेनच्या नदालने केला आहे. या स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात ग्रीसच्या सिटसिपेसने जर्मनीच्या ऍलेक्झांडेर व्हेरेव्हचा 4-6, 6-3, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. सोमवारी घोषित होणाऱया एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सिटसिपेस चौथ्या स्थानावर राहील. आता एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेत तिसरे अजिंक्यपद मिळविण्यासाठी सिटसिपेसचा अंतिम सामना जोकोव्हिच बरोबर होणार आहे.