झाडे उन्मळली, मुसळधार पाऊस, आतापर्यंत 75 इंच नोंद
प्रतिनिधी/ पणजी
मुसळधार पावसाने शनिवारी गोव्याला झोडपून काढले. त्याचबरोबर वादळी वाऱयांमुळे राज्यभरात असंख्य झाडे उन्मळून पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, हवामान खात्याने सायंकाळी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सौराष्ट्राजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कर्नाटक ते गुजरातपर्यंतच्या किनारी भागात वादळी वारे वाहण्याचा इशारा दिलेला आहे. शनिवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान पणजीत 2 इंच इतर दक्षिण गोव्यात सुमारे 3 इंचांपर्यंत पाऊस पडला. यंदाच्या मोसमात आतापर्यंत 75 इंच पावसाची नोंद झालेली आहे. पुढील 24 तासांत म्हणजेच आजदेखील गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला.
शुक्रवारपासून पावसाने पुन्हा झोडपण्यास सुरुवात केली. शनिवारी पहाटे 2 वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस दिवसभर चालूच होता. 16 रोजी सकाळी 8.30 पर्यंत उत्तर गोव्यात 2 इंच इतर दक्षिण गोव्यात 1 इंच पावसाची नोंद झाली होती. तर सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान पणजीत 2 इंच तर मुरगावात जवळपास 3 इंच पावसाची नोंद झाली. दिवसभर राज्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा नद्या-नाले भरून वाहू लागल्या. काही नद्या तर धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचल्या. पणजीतील अनेक रस्ते दुपारी पाण्याखाली गेले.
अग्निशामक दलाची धावाधाव
शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱयाने राज्याला दणका दिला. पणजीसह राज्यातील अनेक भागात शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वादळीवारे वाहत होते. शुक्रवारीदेखील वादळामुळे राज्यभरात अनेक झाडे उन्मळून पडली. तर शनिवारी राज्यभरात 100 हून अधिक झाडे उन्मळून पडली. अनेक वीजतारांवर झाडाच्या फांद्या पडल्याने वीजतारा तुटून पडल्या. राज्यातील अनेक भागात शुक्रवारी वीजप्रवाह बंद पडला. अग्निशामक दलाच्या जवानांचे रात्री उशिरापर्यंत उन्मळून पडलेली झाडे कापून काढून रस्ते वाहतुकीला खुले केले. तसेच वीज कर्मचाऱयांनी कित्येक भागात बंद पडलेला वीजप्रवाह पुन्हा सुरू केला. शुक्रवार व शनिवारी वीज कर्मचाऱयांप्रमाणेच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱयांची धावाधाव झाली.
गेल्या 24 तासांतील पाऊस
शुक्रवारी राज्यात पावसाचे प्रमाण शनिवारच्या तुलनेत मर्यादित होते. शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत राज्यात नोंद झालेला पाऊस पुढीलप्रमाणे. म्हापसा 1.50 इंच, पेडणे 3.5 इंच, पणजी, फोंडा 1.50 इंच, जुने गोवे 2.5 इंच, सांखळी 2 इंच, वाळपई 3 इंच, काणकोण 1.75 इंच, दाबोळी पाऊण इंच, मडगाव 1 इंच, मुरगाव पाऊण इंच, केपे अर्धा इंच, सांगे 1 इंच पावसाची नोंद झाली.
आज राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सौराष्ट्राजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्याचा परिणाम म्हणून जोरदार वादळी वारे व मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारपासून पावसाचा जोर थोडा कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज व उद्या जोरदार वादळीवाऱयामुळे समुद्राच्या लाटा 3.5 ते 4.5 मीटर एवढय़ा उंचीवर उसळतील, असा इशारा देण्यात आलेला आहे.