इंग्लंडविरुद्ध तिसरी व शेवटची कसोटी
वृत्तसंस्था / सेंट जॉर्ज (ग्रेनेडा)
जोशुआ डिसिल्वाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर तिसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीतील शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी यजमान विंडीजने इंग्लंडवर पहिल्या डावात नाममात्र 28 धावांची आघाडी मिळविली आहे. जोशुआ डिसिल्वा 54 धावांवर खेळत आहे. इंग्लंडतर्फे वोक्सने 3 गडी बाद केले.
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिले दोन सामने अनिर्णीत राहिल्याने ही शेवटची कसोटी निर्णायक असल्याने दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील आहेत. या शेवटच्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांवर आटोपला. यजमान विंडीजने आपल्या पहिल्या डावाला शुक्रवारी सुरूवात केली. पण, इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजची चहापानापूर्वी स्थिती 6 बाद 95 अशी केविलवाणी झाली होती.
23 वर्षीय डिसिल्वाने सातव्या गडय़ासाठी मेयर्ससमवेत 33 धावांची भागीदारी केली. मेयर्सने 39 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 28 धावा जमविल्या. डिसिल्वाने रोशसमवेत नवव्या गडय़ासाठी अभेद्य 55 धावांची भागीदारी केली. रोश 63 चेंडूत 4 चौकारांसह 25 तर डिसिल्वा 152 चेंडूत 4 चौकारांसह 54 धावांवर खेळत आहे. जोसेफने 59 चेंडूत 1 षटकार आणि दोन चौकारांसह 28 धावा जमविल्या.
तत्पूर्वी, कँपबेल आणि कर्णधार ब्रेथवेट यांनी डावाला बऱयापैकी सुरूवात करून देताना 17 षटकांत 50 धावांची भागीदारी केली. ब्रेथवेट बाद झाल्यानंतर विंडीजचे पाच फलंदाज 45 धावांत तंबूत परतले. कँपबेलने 54 चेंडूत 4 चौकारांसह 35, ब्रेथवेटने 1 चौकारांसह 17, ब्रुक्सने 2 चौकारांसह 13, बॉनेरने 4, ब्लॅकवूडने 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. होल्डरला खाते उघडता आले नाही.
दिवसअखेर विंडीजने पहिल्या डावात 86 षटकांत 8 बाद 232 धावा जमवित इंग्लंडवर 28 धावांची आघाडी मिळविली. इंग्लंडतर्फे वोक्सने 48 धावांत 3, ओव्हरटनने 71 धावांत 2, स्टोक्सने 40 धावांत 2 आणि शकीब मेहमूदने 39 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव सर्वबाद 204, विंडीज प. डाव-86 षटकांत 8 बाद 232 (डिसिल्वा खेळत आहे 54, रॉच खेळत आहे 25, ब्रेथवेट 17, कँपबेल 35, ब्रुक्स 13, बॉनेर 4, ब्लॅकवूड 18, होल्डर 0, मेयर्स 28, जोसेफ 28, वोक्स 3-48, ओव्हरटन 2-71, स्टोक्स 2-40, शकीब मेहमूद 1-39).