वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभर पाय पसरले आहेत. प्रत्येकजण या रोगाचा सामना करण्यासाठी विविध प्रकारे आपल्या देशास मदत करीत आहे. काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत, काही रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. दरम्यान इंग्लंडचा स्टार खेळाडू जोस बटलरने कोरानाविरुद्ध लढण्यासाठी वर्ल्ड कप 2019 च्या जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. बटलरने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.
लिलाव होणाऱया इंग्लंडच्या शर्टवर विश्वचषक जिंकणाऱया त्याच्या सर्व साथीदारांनी स्वाक्षऱया केल्या आहेत, असे बटलरने सांगितले. ‘लंडनमधील रॉयल ब्रॉम्प्टन हॉस्पिटल चॅरिटीसाठी निधी गोळा करण्यासाठी मी माझा वर्ल्ड कप फायनल शर्टचा लिलाव करणार आहे. गेल्या आठवडय़ात त्यांनी कोविड-19 च्या प्रादुर्भावादरम्यान बाधित झालेल्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
यामुळे या जर्सीचा लिलाव करुन जी रक्कम येईल, ती चॅरिटीला देणार असल्याचेही बटलरने यावेळी स्पष्ट केले.