90 देशांना पश्चाताप : लसीकरण तरीही संक्रमणाचा तीव्र फैलाव
वृत्तसंस्था /सेशेल्स
मंगोलियाच्या सरकारने यंदाच्या उन्हाळय़ाचा ऋतू कोरोनामुक्त राहणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले होते. तर लवकरच जनजीवन सुरळीत होणार असल्याचे बहारीनने स्वतःच्या लोकांना सांगितले होते. सेशेल्स स्वतःच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याच्या प्रयत्नात होता. पण आता ही सर्व आश्वासने-दावे खोटे ठरत आहेत. निम्म्याहून अधिक लोकसंख्येच्या लसीकरणानंतरही या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. चिनी सिनोफार्म आणि सिनोवॅक लसीवर भरवसा ठेवणे या देशांना चांगलेच महागात पडले आहे.
सेशेल्स, बहारीन, चिली आणि मंगोलियाने लसीकरणच्या वेगात अमेरिकेलाही मागे टाकले आहे. या देशांमध्ये 50 ते 68 टक्के लोकसंख्येला लस देण्यात आली आहे. पण मागील आठवडय़ात संक्रमण वृद्धीप्रकरणी हे देश पहिल्या 10 देशांमध्ये सामील हेते. केवळ हे चार देश नव्हे तर चीनकडून सुमारे 90 देशांनी लस विकत घेतली आहे आणि यातील बहुतांश देश या लसींच्या प्रभावावरून चिंतेत पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
चिनी लसीबद्दल संशय
चिनी लस नव्या व्हेरियंट्सचा फैलाव रोखण्यास प्रभावी नसल्याचे या देशांमधील कोरोना संकट दर्शवित आहे. अशा स्थितीत या देशांमध्ये पुन्हा लॉकडाउन, टेस्टिंग आणि अर्थव्यवस्था मंदावण्याचे संकट निर्माण होण्याचा धोका आहे. याचबरोबर उर्वरित लोकांना लसीकरणासाठी तयार करणेही आता अवघड ठरणार आहे.
चार देशांना फटका 68 टक्के लोकसंख्येला सिनाफोर्म लस दिलेल्या सेशेल्समध्ये दर 10 लाख लोकांमागे 716 नवे कोरोनाबाधित सापडत आहेत. मंगेलियात 52 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तेथे प्रतिदिन नव्या रुग्णांची संख्या 4 पटीने वाढली आहे. बहारीन आणि युएईतही संक्रमण वाढले आहे. अमेरिकेत 45 टक्के लोकसंख्येच्या लसीकरणानंतर रुग्ण 94 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. 57 टक्के लसीकरण झालेल्या इस्रायलमध्ये 10 लाख लोकांमागे केवळ 4.95 नवे रुग्ण आढळत आहेत.