वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना टाईम मॅगझीनने वर्ष 2020 साठी ‘पर्सन ऑफ द इयर’ घोषित केले आहे. बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या छायाचित्रांचा एक कव्हर फोटो टाईम मॅगझीनने तयार केला असून त्यांनी मॅगझीनच्या फोटोंसोबतच ‘चेंजिंग अमेरिका स्टोरी’ हे टायटल दिले आहे. गेल्या वषी पर्यावरणाच्या चळवळीत सहभागी असलेल्या ग्रेटा थनबर्गला ‘पर्सन ऑफ द ईयर’ने सन्मानित करण्यात आले होते. तत्पूर्वी 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळाला होता. टाईम मासिकाने वर्षातील सर्वात प्रभावी माणूस म्हणून निवडल्या जाण्याची परंपरा 1927 मध्ये सुरू केली होती. नंतर त्याचे नाव ‘पर्सन ऑफ द इयर’ ठेवले गेले. अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच बहुप्रतिक्षित अशा राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका पार पडल्या. जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना निकालाअंती विजयी घोषित करण्यात आले होते. जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा मोठय़ा फरकाने पराभव केला होता. तर दुसरीकडे उप-राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे कमला हॅरिस यांच्याकडे सोपवण्यात आली होती.