प्रतिनिधी /बेळगाव
इनरव्हील क्लब बेळगाव यांच्यावतीने येथील ज्ञान प्रबोधन शाळेत (आयसीएसई) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. मिलिंद हलगेकर यांनी इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पौंगडावस्था, वयात येताना होणारे बदल या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याबरोबर इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात आला.
आजची बदलती जीवनशैली, समाज माध्यमांचा वापर, शरीरात होणारे बदल, मित्र-मैत्रिणी व त्यांचा प्रभाव, वाईट व चुकीच्या गोष्टींना ठामपणे नकार देणे, चांगल्या सवयींचा अंतर्भाव करणे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रगती साधण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबर इतर छंददेखील विद्यार्थ्यांनी जोपासावे, असे डॉ. मिलिंद हलगेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे डॉ. हलगेकर यांनी निरसन केले.
शिक्षिका नूतन संभाजी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्राचार्या मंजिरी रानडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी, उपाध्यक्षा शालिनी चौगुले, माजी अध्यक्षा स्मिता दळवी, कीर्ती टेंबे तसेच प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग उपस्थित होते.