वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना बहाल केलेली सर्व पदे आणि किताब रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीन गेल्या बऱयाच कालावधीपासून आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनमध्ये विविध पदे भूषवित होते.
आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनच्या बुडापेस्टमध्ये झालेल्या नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्राध्यक्ष पुतीन हे आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनचे मानद अध्यक्ष होते. आता त्यांचे हे पद रद्द करण्यात आले आहे. तसेच ते आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनच्या कार्यकारी समितीमध्ये विकास व्यवस्थापकपद भूषवित होते. तेही रद्द करण्यात आले आहे.