प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी आणि श्री साई काळभैरवनाथ स्पोर्ट्स क्लब गौंडवाड, आर. एम. बॉईज यमनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गौंडवाड येथे लेदरबॉल क्रिकेट प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
प्रशिक्षक सुनील देसाई, विरेश गौडर व नारायण कणबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील खेळाडू क्रिकेटचे धडे घेत आहेत. या अकादमीत सहभागी झालेल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी बेळगावचे नावाजलेले यष्टीरक्षक फलंदाज प्रशांत निरंजन यांनी या अकादमीला क्रिकेटचे किट प्रदान केले आहे.
प्रशिक्षक सुनील देसाई यांच्या प्रयत्नांना हातभार म्हणून प्रशांत निरंजन यांनी क्रिकेट किट प्रदान केले आहे. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बेळगावचे रणजीपटू विजया क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक मिलिंद चव्हाण, बेळगावचे नावाजलेले डावखुरे फिरकी गोलंदाज सचिन साळुंखे उपस्थित होते.
नावाजलेले ग्रामीण क्रिकेटपटू मनोज पाटील व सुनील गुरव यांच्याहस्ते पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी किशोर सुलेमानीकर, सचिन पाटील, दिनेश पाटील, निवास पाटील, लोकेश पाटील व क्रिकेटप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रणजीपटू मिलिंद चव्हाण यांनी या भागात तयार झालेले क्रिकेटपटू उच्चस्तरावर नावलौकीक मिळवतील, अशी अपेक्षा व्यक्त करून अकादमीला शुभेच्छा दिल्या. सचिन साळुंखे यांनीही उपस्थित खेळाडूंना बहुमोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनायक पाटील यांनी केले.