प्रतिनिधी /बेळगाव
मुलांना लहान वयातच व्यसनापासून दूर ठेवून त्यांच्यावर चांगले संस्कार घडविले पाहिजेत. शिवाजी महाराज, सावरकर, टिळक यांची शिकवण मुलांवरती बिंबवली पाहिजेत. शिवचरित्र, रामायण आणि महाभारत हा हिंदुस्थानचा इतिहास आहे. अशा संस्कृतीचे जतन करून राष्ट्र घडविले पाहिजे, असे उद्गार लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन किरण ठाकुर यांनी काढले.
भाग्यनगर येथील लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या विभागीय (रिजनल) कार्यालयात शुक्रवारी महालक्ष्मी पूजन आणि ज्येष्ट स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संचालक अजित गरगट्टी, पंढरी परब, सीईओ अभिजीत दीक्षित, ज्येष्ट स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी, रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी उपस्थित होते.
प्रारंभी ऍड. विश्वनाथ जोशी यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन झाले. यावेळी ज्येष्ट स्वातंत्र्यसैनिक व सोसायटीचे सभासद राजेंद्र कलघटगी (वय 102) यांचा किरण ठाकुर यांच्या हस्ते हार, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. तसेच बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी किरण ठाकुर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सोसायटीतर्फे सन्मान करण्यात आला.
पंढरी परब यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रपुरुष महान साधू संतांनी आपली हयात घातली असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. सत्काराला उत्तर देताना राजेंद्र कलघटगी म्हणाले, शुद्ध आहार आणि योग्य व्यायामामुळेच वयाची शंभरी गाठली आहे. युवकांनीदेखील शुद्ध आहाराबरोबर व्यायामाकडे वळावे असे सांगितले.
याप्रसंगी आरएफओ वीरसिंग भोसले, संचालक अनिल चौधरी, गजानन धामणेकर, असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील, मुख्य सेक्मयुरिटी ऑफिसर कर्नल दीपक गुरव यासह कर्मचारी उपस्थित होते. समन्वयक विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर एम. एन. कुलकर्णी यांनी आभार मानले.