ऑनलाईन टीम / पुणे :
ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. वृद्धापकाळ आणि हृदयाच्या आजारामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, आज दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे.
10 जून 1938 साली राहुल बजाज यांचा जन्म झाला. अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठातून एमबीए चे देखील शिक्षण घेतले होते. 1965 मध्ये त्यांनी बजाज ग्रृपची सूत्रे हातात घेतली. राहुल बजाज यांच्या नेतृत्वात बजाज ग्रृपचा टर्नओव्हर हा 7. 2 कोटींवरुन थेट 12 हजार कोटीवर जाऊन पोहचला. बजाज स्कूटर विकणारी देशातील अव्वल ग्रृप म्हणून नावारुपास आला. त्यानंतर 2005 मध्ये ग्रृपची जबाबदारी त्यांचे पुत्र राजीव बजाज यांना देण्यात आली.
बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मागील वर्षीच त्यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी नीरज बजाज यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती.