कणकवली / वार्ताहर-
महाराष्ट्रातील आघाडीचे गझलकार व सिंधुदुर्गचे सुपुत्र मधुसुदन नानिवडेकर (मूळ रा. नानिवडे – वैभववाडी व सध्या रा. तळेरे) यांचे यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने गझल विश्वातील प्रेमाचा शायर हरपला, अशा भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहेत.
प्रतिभावंत कवी, गझलकार असलेले नानिवडेकर गेली कित्येक वर्षे पत्रकारीतेतही कार्यरत होते. अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भुषवले होते. नानिवडे गावच्या सरपंचपदाची धुराही त्यांनी पेलली होती. मनमिळावू, हसतमुख, विनोदी स्वभावामुळे अनेकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या निधनामुळे जिल्हाभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.