मुंबई / ऑनलाईन टीम
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते.
या निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.
आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली महाराष्ट्र येथे झाला त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर हे एक शास्त्रीय गायक आणि संगितकार होते. आशा भोसले यांनी पहिले गाणे ‘माझा बाळ’ या चित्रपटाकरता गायले होते. त्यांचे पहिले हिंदी गाणे 1948 साली चुनरिया या चित्रपटाकरता ‘सावन आया’ हे होते. त्यांनी आपले पहिले सोलो गाणे “रात की रानी” या चित्रपटातील “आयेगा आयेगा” हे गाणे गायले होते. त्यानंतर आशाजींनी कधीच मागे वळुन पाहिले नाही. त्यांनी अनेक भाषांमध्ये गायन केले आहे. शास्त्रीय संगीत, कव्वाली, भजन, गजल, गंभीर गाणे असो वा रोमांटिक सर्व प्रकारची हजारो गाणी गायिली. त्यांच्या नावे 12000 पेक्षा जास्त गाण्यांचा विक्रमही आहे. त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्येही समाविष्ट झाले आहे, त्यांनी 20 भारतीय आणि 12 विदेशी भाषांमध्ये गायन केलं आहे. भारत सरकारकडून आशा भोसले यांना या विक्रमासाठी 2000 साली ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार आणि 2008 मधे पद्म विभुषण अवार्ड देऊन सन्मानित केले आहे. आशा भोसले यांना एकुण 18 नॉमिनेशनस् पैकी 7 फिल्मफेयर अवार्ड मिळाले आहेत.