प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात सत्ता ब प्रकारामुळे नागरिकांना त्यांच्या जागेवर विकसन करता येत नाही. वा विकसीत करता येत नाही. हजारो प्रकरणे सातारा शहरात असून, सत्ता ब प्रकाराची प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांनी निकाली काढावीत यासाठी अनेकदा इशारे, आंदोलने करुनही कार्यवाही होत नाही. याकरता आता शहरातील ज्येष्ठ नागरिक दि. 23 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत. शंकर माळवदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यात याव्यात. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करण्यात यावी, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यवाही करण्यात यावी, या प्रकरणातील मुल्यांकन अधिमुल्य रक्कमांची चलने आपल्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात यावीत, इतर कामाचा व्याप विचारात घेता, या कामावर वेळीच स्वाक्षरी करण्यात आपल्याला अवघड जात असल्यास याकामी जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्सम व सक्षम अधिकाऱ्यांकडे अधिकार प्रदान करण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.