शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कोल्हापूर / प्रतिनिधी
गेली साडेसहा दशके राज्यातील कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांचा बुलंद आवाज बनून अन्यायाविरुद्ध झुंज देत असंख्य लढे उभारणारे सामाजिक चळवळीचे अर्ध्वयू ज्येष्ठ नेते विचारवंत, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करत डॉ. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे दोन चिरंजीव सुहास व प्रशांत यांनी पार्थिवाला अग्नी दिला. प्रशासनाच्या वतीने मानवंदना आणि बंदूकीच्या 3 फैरी झाडून ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार जी. डी. लाड, पार्थ पवार यांच्यासह सुन संगिता पाटील, नात रिया पाटील, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अपर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण, पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील, रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य टि. एस. पाटील, अजित सुर्यवंशी, प्रसाद कुलकर्णी, उल्का महाजन, महादेव बाड, मोहन राजमाने, रविंद्र पवार, प्राध्यापक देवेंद्र गायकवाड, संजय आवटी, गणेश ठाकूर, व्हि. एस. शिवणकर, अनिल पाटील, अविनाश पाटील, सिमा पाटील, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या मुक्ता दाभोळकर, डॉ. हमिद दाभोळकर, उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शाहू कॉलेजच्या पटांगणावर ठेवण्यात आले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अंत्यविधीसाठी पार्थिव कसबा बावडा येथील स्मशानभूमीमध्ये आणण्यात आले. यावेळी कसबा बावडा परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सकाळी 12 ते 4 या वेळेत बावडय़ातील सर्व व्यवहार बंद ठेवून एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पार्थिव स्मशानभूमीकडे नेताना रस्त्याच्या दुतर्फा नागरीकांनी गर्दी केली होती.
स्मशानभूमीमध्ये केवळ मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली होती. अंत्यविधीवेळी स्मशानभूमीकडे केवळ मोजक्याच लोकांना सोडण्यात येत होते. स्मशानभूमीकडे येणारे सर्व मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आले होते. अग्नीदिल्यानंतर मान्यवर रवाना झाले. यानंतर सर्व नागरीकांनी एन. डी. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचगंगा स्मशानभूमीकडे धाव घेतली.