ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच आता मुंबईतील शिवसेना भवनात कोरोनाने शिरकाव केला आहे. शिवसेना भवनात नियमित येणाऱ्या एका ज्येष्ठ शिवसैनिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सुरक्षेच्या दृष्टीने आठवडाभरासाठी शिवाजी पार्क येथील शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिवसैनिकाला सोमवारी कोरोनाची बाधा झाली लक्षात येताच संपूर्ण शिवसेनाभवन निर्जंतुकीकरण केले जात असून, पुढील आठवडाभरासाठी कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची बाधा झालेला शिवसैनिक हा पक्षातील एका खासदाराचा निकटवर्तीय आहे, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, आतापर्यंत शिवसेनेतील अनेक नगरसेवकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता तर थेट शिवसेना भवनमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने आतमध्ये काम करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.