प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या जुन्या पिढीतील ज्येष्ठ प्रसूती तज्ञ व स्त्री रोगतज्ञ डॉ. देवयानी जयंत देशपांडे (वय 72) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून व नातू असा परिवार आहे.
डॉ. देवयानी या मूळच्या मुंबईच्या. कर्नाटकसिंह गंगाधरराव देशपांडे यांचे नातू डॉ. जयंत यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या बेळगावला आल्या. रामदेव गल्लीतील निवासस्थानी डॉ. जयंत व डॉ. देवयानी यांनी हॉस्पिटल चालविले. डॉ. जयंत देशपांडे हे बेळगावचे नामांकित आर्थोपेडिक सर्जन म्हणून ओळखले जात होते. डॉ. देवयानी यांना साहित्य, संगीत आणि नाटय़ यांची विशेष आवड होती. त्यांचा स्वतःचा असा व्यापक पुस्तक संग्रह होता.
शारदोत्सव सोसायटीच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. रौप्यमहोत्सवी शारदोत्सव सोहळय़ाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत टी. एन. शेषन, किरण बेदी आदी मातब्बर व्यक्तींना बेळगावला पाहुणे म्हणून आणण्यात त्यांचा पुढाकार होता. डॉ. देवयानी यांनी अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना नेहमीच मदत केली. बेळगावच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या निधनाने बेळगावकरांनी एक रसिक व्यक्तिमत्त्व गमावले आहे.