प्रतिनिधी/ मडगाव
मडगावातील मराठी भाषेचे कट्टर अभिमानी तसेच अरूणा अश्रफ अली यांच्या सोबत ‘भारत छोडो चळवळी’त सहभागी झालेले भारतीय स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास सखाराम मळकर्णेकर (91) यांचे काल गुरूवारी सकाळी 8.45 वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी मडगाव हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्च्यात पत्नी : विजया, पूत्र : सुदेश, स्नुषा : उमा तसेच विवाहीत कन्या सुचिता मेहता व सुलभा नाईक तसेच नातवंडे असा परिवार आहे.
तुळशीदास मळकर्णेकर हे 91 वर्षाचे असतानाही आरोग्याने चांगले होते. दररोज संध्याकाळी ते आपल्या घराभोवती फेरफटका मारायचे. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांना घरातून बाहेर पडणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे ते काहीसे खचले होते. बुधवारी त्यांची प्रकृती किंचित खालावली होती व गुरूवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारतीय स्वातंत्र्य, गोवा मुक्तीलढय़ात सहभाग
2 नोव्हेंबर 1929 रोजी केपे येथे जन्म झालेल्या तुळशीदास मळकर्णेकर यांचे शिक्षण मुंबईत झाले. गोवा स्वातंत्र्यानंतर ते 1961 साली ते गोव्यात परतले. मुंबईत असताना ते 1942 साली अरूणा अश्रफ अली यांच्या सोबत भारत छोडो चळवळीत सहभागी झाले. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. 9 दिवस ते तरूंगात राहिले. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य तसेच काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा प्रमुख होते. वरळी-मुंबई येथे त्यांनी गांधी आश्रमात राहून आठ दिवस हरिजन वस्तीत सफाई मोहिम राबविली होती. गोमंत आझाद दलासाठी त्यांनी शिबीरही आयोजित केले होते. गोवा स्वातंत्र्यलढय़ात भूमिगत राहून त्यांनी आपल्यापरिने योगदान दिले होते.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांना 15 दिवसांचा तुरूंगवास भोगावा लागला होता. जनता दल गोवाचे ते ज्येष्ठ उपाध्यक्ष होते.
सहकार क्षेत्रात योगदान
तुळशीदास मळकर्णेकर यांनी गोव्याच्या सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले होते. सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘गोवा सहकार श्री’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले होते. नावेली-तळावली को-ऑप व्ही. के. सोसायटी, मडगाव अर्बन को-ऑप बँक, सासष्टी तालुका पोल्ट्री फार्म, गोवा को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग ऍन्ड सप्लाय फेडरेशन लि., धनश्री को-ऑप क्रेडिट सोसायटी, सासष्टी तालुका घर तारण सोसायटी, मडगाव नगर समिती, गोवा मराठी अकादमी, भारतीय मित्र मंडळ (मुंबई) व गोवा राज्य को-ऑपरेटिव्ह बँकचे ते संस्थापक सदस्य होते.
पत्रकारितेतही योगदान
तुळशीदास मळकर्णेकर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही योगदान दिले होते. गोवा पत्रकार संघ आणि दक्षिण गोवा पत्रकार संघाचे ते संस्थापक सदस्य, ‘उषकाल’ या वार्षिक दिवाळी अंकाचे उपसंपादक म्हणून त्यांनी काम केले होते. मुंबईच्या ‘नवाकाळ’ व ‘नवशक्ती’ तसेच दै. गोमंतकसाठी त्यांनी वृत्ताकंन केले होते. साप्ताहिक ‘तरूण गोवा’चे ते भागीदार होते. ‘पंख होते त्या दिवसांना’ या त्यांच्या पुस्तकाला मराठी अकादमीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता.
सामाजिक कार्यात सहभाग
मडगावच्या गोमंत विद्या निकेतनचे कित्येक वर्षे ते सचिव म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते या संस्थेचे अध्यक्षही झाले. मल्लिकार्जुन देवस्थानचे सचिव तसेच साहित्य सेवक मंडळाचे कार्यकारी सदस्य होते.
देहदानाचे स्वप्न अपुरे राहिले
तुळशीदास मळकर्णेकर यांनी नेत्रदान व देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आवश्यक असलेले सोपस्कार देखील पूर्ण केले होते. मात्र, काल गुरूवारी सकाळी त्यांचे निधन झाल्यानंतर देहदान करण्याविषयी त्यांचे पूत्र सुदेश यांनी उद्योजक दत्ता नायक यांच्याशी संपर्क साधला. मात्र, कोरोना महामारीमुळे देहदान करणे शक्य नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. वयोमान झाल्याने नेत्रदानही त्यांना करता आले नाही. त्यामुळे देहदान व नेत्रदान करण्याच्या त्यांच्या इच्छा अपुऱया राहिल्या.
काल त्यांच्या निधनाची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, उद्योजक दत्ता नायक तसेच इतर असंख्य मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थांनी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले व श्रद्धांजली वाहिली.
सहकार चळवळीतील योगदान कायम लक्षात राहिल
तुळसीदास मळकर्णेकर यांचे निधन झाल्याने आपल्याला तीव्र वेदना झाल्या, त्यांनी गोव्यातील सहकारी चळवळीत दिलेले योगदान आगामी पिढय़ांच्या कायम लक्षात राहिल असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
पित्रूतुल्य व्यक्तीमत्व गमावले
तुळशीदास मळकर्णेकर हे आपल्यासाठी पित्रूतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांच्याशी भेट झाली की ते आस्थेने विचारपूस करायचे, गोव्याचे सहकार क्षेत्र, राजकारण, समाजकारण इत्यादी विषयांवर ते संवाद साधायचे. त्यांच्या जाण्याने आपल्याला दुःख होत असल्याची प्रतिक्रीया फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी व्यक्त केली आहे.
सहकार चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते
तुळशीदास मळकर्णेकर हे सहकार चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व अभ्यासक होते. मडगाव मधील तसेच इतर अनेक संस्थांशी ते जोडलेले होते. त्यांच्या जाण्याने आपल्याला दुःख होत असल्याचे दक्षिण गोव्याचे माजी खा. नरेंद्र सावईकर यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.