ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम – महिला एकेरीत व्हीनस विल्यम्स, बियान्का आंद्रेस्क्यू, पेत्रा क्विटोव्हाचे आव्हान संपुष्टात
मेलबर्न / वृत्तसंस्था
येथील ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्बियाचा अव्वल मानांकित नोव्हॅक ज्योकोव्हिचला तुलनेने नवख्या अमेरिकन टेनिसपटू टायफोविरुद्ध विजयासाठी तब्बल साडेतीन तास झुंजावे लागले तर दिमित्रोव्ह, निक किर्गिओस, कॅरेनो बुस्टा, महिला एकेरीत सेरेना विल्यम्स, सिमोना हॅलेप, ओसाका आदी खेळाडूंनी सहज विजयासह तिसऱया फेरीत धडक मारली.
23 वर्षांचा टायफो यापूर्वी अव्वलमानांकित खेळाडूविरुद्ध कधीही लढला नव्हता आणि पहिल्या पाचमधील कोणत्याही खेळाडूला हरवणे आजवर त्याला शक्य झाले नव्हते. पण, यानंतरही त्याने सर्बियाच्या ज्योकोव्हिचला चांगलेच झुंजवले. ज्योकोव्हिचने अंतिमतः 6-3, 6-7 (3), 7-6 (2), 6-3 अशा फरकाने कसाबसा विजय संपादन केला. रॉड लेव्हर एरेनावरील ही लढत साडेतीन तास चालली होती. उभयतातील चौथा सेट टायब्रेकरच्या दिशेनेच होता. पण, सर्व्हिसवर अतिरिक्त वेळ घेतल्याने त्याला समज देण्यात आली. यावेळी अचानक तो संतापला आणि त्याची एकाग्रताही भंगली. यातून त्याने डबल-फॉल्ट केला आणि जणू त्याच्या साडेतीन तासांच्या एकाग्र खेळीला पूर्णविराम लाभला. ज्योकोव्हिचने याचा लाभ घेत निर्णायक क्षणी विजयावर शिक्कामोर्तब केले.
टायफोला येथे निराशा लपवता आली नाही. ज्योकोव्हिचने मात्र कोर्टला हाताने वंदन केले, तिएफोशी हस्तांदोलन केले आणि त्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत विजयाचा आनंद साजरा केला. ज्योकोव्हिच एकंदरीत खेळात टायफोपेक्षा सरस ठरला. त्याने टायफोच्या 23 च्या तुलनेत 26 बिनतोड सर्व्हिस नोंदवल्या आणि पाच संधीचे ब्रेकपॉईंटमध्ये रुपांतर केले.
ज्योकोव्हिचच्या तुलनेत गतवर्षी उपजेतेपदापर्यंत मजल मारणाऱया डॉमिनिक थिएमने सहज विजय मिळवला. त्याने डॉमिनिक कोएफरला 6-4, 6-0, 6-2 अशा फरकाने हरवून दुसरी फेरी जिंकली. महत्त्वाच्या तीन स्पर्धा जिंकणाऱया 2014 ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्टॅन वावरिंकाने मात्र पाचव्या सेटमध्ये मोठी आघाडी वाया घालवली आणि टायब्रेक, तीन मॅचपॉईंट गमावत सामना जणू बहाल केला. मॅटॉर्न फुक्सोव्हिक्सने या लढतीत 7-5, 6-1, 4-6, 2-6, 7-6 (9) अशा फरकाने वावरिंकावर विजय मिळवला.
अन्य लढतीत दिमित्रोव्हने बोल्टचा 7-6, 6-1, 6-2, किर्गिओसने हम्बर्टचा 5-7, 6-4, 3-6, 7-6, 6-4 अशी पिछाडी भरुन काढत पराभव केला. व्हेरेव्हने क्रेसेचे आव्हान 7-5, 6-4, 6-3 असे संपुष्टात आणले तर शॅपोव्हॅलोव्हने टॉमिकला 6-1, 6-3, 6-2 असे पराभूत केले.
सेरेनाची आगेकूच
महिला गटात सेरेना विल्यम्सने 24 व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने आगेकूच करताना निना स्टोजानोव्हिकचा 6-3, 6-0 असा फडशा पाडला. सेरेनाची ज्येष्ठ भगिनी व्हीनस विल्यम्सचे मात्र स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तिला सारा इराणीविरुद्ध 6-1, 6-0 अशा सरळ फरकाने पराभव स्वीकारावा लागला. व्हीनसला या सामन्यादरम्यान गुडघ्याच्या दुखापतीचा सातत्याने त्रास झाला आणि एकदा तर ती वेदनेने अक्षरशः कळवळली होती. 40 वर्षीय व्हीनससाठी एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळण्याची ही विक्रमी 88 वी वेळ होती.
अन्य लढतीत माजी अमेरिकन चॅम्पियन बियान्का आंद्रेस्क्यूला तैवानच्या हेश सू-वेईकडून 6-3, 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. 20 वर्षीय कॅनेडियन आंद्रेस्क्यू दुखापतीतून सावरल्यानंतर येथे 15 महिन्यांनी पुनरागमन करत होती. वास्तविक, हेश 71 वी मानांकित आहे आणि तिच्या खेळात सातत्याचा कमालीचा अभाव आहे. पण, यानंतरही तिने काही वेळा दिग्गजांना पराभवाचा धक्के देण्याचा पराक्रम गाजवला आहे. 2018 विम्बल्डनमध्ये विद्यमान अव्वलमानांकित सिमोना हॅलेप व 2019 मियामी स्पर्धेत नाओमी ओसाकाला दिलेले पराभवाचे धक्के याचा त्यात आवर्जून उल्लेख होतो. जपानच्या नाओमी ओसाकानेही तिसरी फेरी गाठताना कॅरोलिना गार्सियाचा 6-2, 6-3 असा पराभव केला तर दुसऱया मानांकित सिमोना हॅलेपला आलिया टोम्लानोविकवर 6-4, 4-6, 7-5 असा विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला.
मॅरिनो पराभूत
आणखी एक कॅनेडियन खेळाडू रेबेक्का मॅरिनोला 19 व्या मानांकित मर्केटा व्होंड्रुसोव्हाविरुद्ध 6-1, 7-5 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. दोनवेळची विम्बल्डन जेती व 2019 ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम उपजेती पेत्रा क्विटोव्हाला सोराना सर्स्टियाकडून 6-4, 1-6, 6-1 7-5 तर विद्यमान ऑस्ट्रेलियन उपविजेती मुगुरुझाने सॅम्सोनोव्हाला 6-3, 6-1 असे नमवले. 20 वर्षीय अमेरिकन ऍन लीने ऍलिझ कॉर्नेटला 6-2, 7-6 (2) असे नमवत तिसरी फेरी गाठली तर 7 व्या मानांकित ऍरीना साबालेंकाने डॅनिया कॅसात्किनाला 7-6 (5), 6-3 असे नमवले.
पुरुष गटात 11 व्या मानांकित डेनिस शेपोव्हॅलोव्हने अनुभवी ऑस्ट्रेलियन पात्रताधारक बर्नार्ड टॉमिकला 6-1, 6-3, 6-2 असे तर सहकारी कॅनेडियन मिलोस रेऑनिकने कोरेन्टिन माऊटेटला 6-7 (1), 6-1, 6-1, 6-4 असे पराभूत केले. 8 वा मानांकित दिएगो स्वार्त्झमन व 20 वा मानांकित फेलिक्स-ऑगर यांनीही तिसऱया फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
पुरुष दुहेरीत बोपण्णा-बेनचे आव्हान संपुष्टात
ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत रोहन बोपण्णा व त्याचा जापनीज सहकारी बेन मॅकलॅचलन यांना जी सूंग नाम व मिन-क्यू या कोरियन वाईल्डकार्डधारक जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला आणि पुरुष दुहेरीतील आणखी एका लढतीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. कोरियन जोडीने त्यांना 6-4, 7-6 (0) एक तास 17 मिनिटाच्या लढतीत सहज नमवले. सक्त क्वारन्टाईन नियमांमुळे बोपण्णा व जापनीज सहकारी बेनला पुरेसा सराव करता आला नव्हता. याचा त्यांना फटका बसला. बोपण्णा 14 दिवस आपल्या रुममध्ये होता आणि 30 जानेवारीलाच तो सरावाच्या स्पर्धेत उतरु शकला.
वास्तविक, बोपण्णा व बेन या जोडीने नवख्या कोरियन जोडीविरुद्ध सहज विजय संपादन करणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात कोरियन जोडीने उत्कृष्ट मिलाफ साधत संतुलित, आक्रमक खेळ साकारला आणि प्रारंभापासूनच बोपण्णा-बेन यांना झगडणे भाग पाडले. बेनचा एक फोरहँडचा चुकीचा फटका नेटमध्ये अडकला आणि येथे कोरियन जोडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. या स्पर्धेत आता दिविज शरण (पुरुष दुहेरी) व पदार्पणकन्या अंकिता रैना (महिला दुहेरी) यांच्यावर भारताची उरलीसुरली भिस्त असणार आहे.