काँग्रेसमध्ये असताना चिंता करायला हवी होती
भोपाळ
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानावर भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपमध्ये ज्योतिरादित्य हे बॅक बेंचर असल्याचे राहुल यांनी म्हटले होते. मी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी यांनी इतकी चिंता केली असती तर ही वेळच आली नसती अशी उपरोधिक प्रतिक्रिया ज्योतिरादित्य यांनी दिली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले ज्योतिरादित्य यांनी 11 मार्च 2020 रोजी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते. त्यानंतर मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या 22 आमदारांनीही राजीनामा दिल्याने कमलनाथ यांचे सरकार कोसळले हेते. एक वर्षाने राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव घेत खोचक टिप्पणी केली होती. तर राहुल गांधी यांच्या विधानावर भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केली ओह. तसेच ट्विटरही सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी ट्रेंड करू लागली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नवरा म्हणून दुसऱयालाच दाखविले, पण विवाह तिसऱयाशीच लावून दिल्याची उपरोधिक टिप्पणी भाजपने केली आहे.