चित्रकार शेखर आडपईकर यांच्या कुंचल्यातून साकारले बाळासाहेब
प्रतिनिधी / फोंडा
चित्रकाराच्या आयुष्यात एखाद्या महान चित्रकाराला रेखाटण्याचे क्षण क्वचितच येतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारख्या महान व्यंगचित्रकाराची प्रतिमा रंगविणे हे तर परमभाग्यच. आडपई फोंडा येथील चित्रकार शेखर दुलो वस्त आडपईकर यांच्या जीवनात नुकताच हा क्षण आला. 17 नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. मुंबई येथील बाळासाहेबांच्या एका चाहत्यांने शेखरकडून खास हे पेंटिंग काढून घेतले आहे. ते साकारताना ‘ज्योतीने तेजाची आरती’ अशी या छोटय़ा पण जातीवंत चित्रकाराची अवस्था झाली असावी.
शेखरची चित्रकलेची सुरुवात अगदी शालेय जीवनापासूनच झाली. गेली 35 वर्षे तो या रंगांच्या दुनयेत रंगलेला आहे. चित्रकलेचे कुठलेही तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण न घेताही त्याने ही कला आत्मसात केली. त्याने साकारलेल्या पेंटिंगमधूनच त्याचा प्रत्यय येतो. आजवर शंभरहून अधिक पोट्रेट रंगविल्या या कलाकाराने रांगोळय़ांच्या माध्यमातूनही लोकमान्य टिळक, बालगंधर्व, नाना पाटेकर, प्रभूपाद स्वामी यासह अनेक व्यक्तीरेखा साकारल्या. सलग पंचवीस वर्षे तो रांगोळी स्पर्धेत उतरायचा. राज्यात वर्षाकाठी विविध ठिकाणी होणाऱया साधारण 35 रांगोळी स्पर्धांमध्ये किमान 20 ठिकाणी त्याला प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळायची. रांगोळी स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून निमंत्रणे येऊ लागल्याने त्याने नवीन स्पर्धकांसाठी आपली ही जागा रिकामी केली.
तैलरंग व पाण्याच्या रंगातून शेखरने साकारलेले अनेक पोट्रेट फोंडय़ासह गोव्यातील विविध घरामध्ये पाहायला मिळतात. अनेक कुटुंबियांनी आपले दिवंगत आई वडील किंवा पूर्वजांची चित्रे त्याच्याकडून तयार करून घेतली आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनाच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली म्हणून अवघ्या दोन तासात रेखाटलेले पर्रीकरांचे तैलचित्र तर अप्रतिम असेच होते. माजी आमदार व साहित्यिक स्व. विष्णू सुर्या वाघ यांचे पोट्रेट कला अकादमीच्या दालनात पाहायला मिळते. फोंडय़ातील संगीत शिक्षक लाडू गावणेकर, उद्योगपती विश्वासराव चौगुले अशा अनेक व्यक्तीरेखा त्याच्या कुंचल्यातून उतरल्या आहेत. करंजाळ मडकई येथील श्री नवदुर्गा गावशीकान्न देवी ज्या ठिकाणी प्रकटली त्या स्थानावर लावलेले प्रशस्त असे देवीचे प्रकट रुपातील पेंटिंग शेखरच्या प्रतिभेतूनच साकारले आहे.
बाळासाहेब ठाकरे हे उच्च प्रतिभेचे चित्रकार व व्यंगचित्रकार होते. पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधीपासून अनेक राजकीय नेत्यांवरील त्यांची कार्टुन्स अजरामर झाली. अशा महान चित्रकाराला रेखाटण्याचे लाभलेले भाग्य हे अवर्णनीय व अविस्मरणीय असेच आहे, असे शेखर आडपईकर सांगतात.