ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी भारतातील राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवला आहे.
बिडेन हे डेमॉक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. या पक्षातील एक प्रभावशाली गट भारतातील काश्मीर मुद्यांवरील घडामोडीवर नाराज आहे. बिडेन यांनी काश्मीरमधील नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी भारताने प्रयत्न करायला हवेत, असे म्हटले आहे.
राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ईशान्य भारतात झालेली आंदोलने हा चिंतेचा विषय आहे, तसेच सीएए आणि एनआरसी सारखी पावले भारतीय लोकशाहीच्या बहुसांस्कृतिकता आणि धर्मनिरपेक्षतेच्या सातत्याने सुरू असलेल्या परंपरेच्या विरोधात आहेत. शांततामय आंदोलनांवर आणि इंटरनेट वापरावर बंदी घातल्याने लोकशाही कमकुवत होते, असेही त्यांनी म्हटले आहे.