अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी उमेदवाराला आव्हान
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक 2020 साठी पहिला अध्यक्षीय वादविवाद मंगळवारी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विचित्र विधान केले आहे. वादविवादापूर्वी किंवा त्यानंतर डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी ड्रग टेस्ट करवून घ्यावी. मी देखील यासाठी तयार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अलिकडच्या काळात ट्रम्प यांनी अनेकदा बिडेन यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी बिडेन मानसिकदृष्टय़ा अध्यक्षपदासाठी पात्र नसल्याचे आयोवा येथील सभेत म्हटले होते.
झोपेत राहणाऱया बिडेन यांची अध्यक्षीय वादविवाद कार्यक्रमापूर्वी किंवा नंतर ड्रग टेस्ट करण्याची मागणी करत असल्याचे ट्रम्प यांनी एका ट्विटद्वारे म्हटले आहे. मंगळवारी होणाऱया वादविवाद कार्यक्रमाकरता अत्यंत कमी प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. फॉक्स न्यूजचे ख्रिस वॉलेस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक असतील. याव्यतिरिक्त अन्य कुणी यात थेट सहभागी होणार नाही. ट्रम्प यांनी बिडेन यांच्या वयाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. बिडेन 77 वर्षांचे तर ट्रम्प यांचे वय 74 वर्षे आहे. बिडेन यांच्या प्रकृतीवरही ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बिडेन हे शक्ती वाढविणारी औषधे घेत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी अलिकडेच केला आहे. तर बिडेन हे डिमेंशिया सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचा आरोप रिपब्लिकन सिनेटर जोए मर्फी यांनी केला आहे.