करीना ओलिवियाचे गिनिज बुकमध्ये नाव
ब्राझीलची वाइल्डलाइफ फिजिशियन आणि साहसवीर करीना ओलियानी हिने ज्वालामुखीचे 100.3 मीटरचे अंतर दोरखंडाने पार करत गिनिज बुकमध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे. यादरम्यान करीना 329 फुटांच्या उंचीवरून उकळत्या लाव्हारसावरून गेली आहे. अफार प्रांतात एर्टा आले नावाचा एक धोकादायक ज्वालामुखी आहे. तेथून लाव्हारस सातत्याने बाहेर पडत असतो. याचमुळे तेथे लाव्हारसाचा एक सरोवरच तयार झाला आहे.
बालपणापासूनच करीनाला साहसी कृत्यांची आवड होती. बालपणी ती ब्राझीलच्या जंगलांमध्ये बहिणीसोबत हरवली होती. वयाच्या 12 व्या वर्षी तिने स्कुबा डायव्हिंग सुरू केले होते.
विश्वविक्रम करताना तिच्यासमोर सर्वात मोठे आव्हान उकळत्या लाव्हारसाचे हेते. या लाव्हारसाचे तापमान सुमारे 1187 अंश सेल्सिअस होते. तप्त लाव्हारसापासून वाचण्यासाठी तिने विशेष प्रकारचा सूट घातलेला होता. तसेच ऑक्सिजन सिलिंडर आणि हेल्मेटही घातले होते. करीनाने यापूर्वी विमानाच्या पंखावर उभे राहून आकाशात झेप घेतली आहे. तसेच शार्क तसेच व्हेल माशासोबत पोहण्याची कामगिरी तिने करून दाखविली आहे.