प्रतिनिधी/ मडगाव
मडगावचे युवा व्यापारी स्वप्नील वाळके यांच्या मृत्यूवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मडगावचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी या घटनेसंबंधीची खबर ऐकून आपल्याला धक्काच बसला असल्याचे सांगितले.
गोवा राज्यात कायदा व सुवस्था पूर्णपणे कोसळल्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. खुन्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. आमच्या कौटुंबिक स्नेही व समाज सेविका कृष्णी वाळके यांचे ते सुपूत्र. हा आघात सहन करण्याची शक्ती परमेश्वर कृष्णी वाळके यांना देवो. प्रत्येकाने आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार कामत यांनी केले आहे.
नरेंद्र सावईकर
मडगाव येथील कृष्णी ज्वेलर्स या आस्थापनाचे मालक स्वप्नील वाळके यांच्यावरील खुनी हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो. मडगाव पोलिसांनी त्वरित कारवाई करुन या खुनी हल्ल्यातील सहभागी व्यक्तींना ताबडतोब अटक करावी अशी भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी मागणी केली आहे.
दैवज्ञ समाजाला दुःख
दैवज्ञ समाज, मडगावचे अध्यक्ष तसेच जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य अतुल वेर्लेकर यांनी या घटनेसंबंधी दुःख व्यक्त केले करुन दैवज्ञ समाजातील एक बंधु हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि अशी घटना कोणाच्याही वाटय़ाला न येवो अशी प्रार्थना करुन अशा घटनेसंबंधी काही सुचना केल्या.
आज अनेक सुवर्ण पेढय़ात लाखो रुपयांचे दागिने असतात. मात्र स्वतःच्या संरक्षणासाठी दुकान मालकाकडे पिस्तूल नसते. अशा दुकानदारानी स्वरक्षणार्थ कायदेशीररित्या पिस्तूल जवळ बाळगावे असे श्री. वेर्लेकर यांनी आवाहन केले.
गोल्ड डिलर्स संघटनेने अशी एक यंत्रणा राबवावी जणेकरुन एखाद्या शहरातील कोणत्याही ज्वेलरी दुकानात अशा प्रकारची कोणतीही घटना घडते तेव्हा एका बटनावर इतरांना या प्रकाराची कल्पना यावी व त्या दुकानदाराच्या साहाय्याला धावून यावे अशी सुचनाही श्री. वेर्लेकर यांनी केली.
मनोहर रायकर
मनोहर रायकर
दैवज्ञ समाज, मडगावचे माजी अध्यक्ष तसेच या समाजाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष मनोहर रायकर यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठय़ा प्रमाणावर सरकारला कराच्या रुपाने महसूल देणाऱया मडगावातील तसेच गोव्यातील सर्व सुवर्ण पेढींना प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी केली. व्यापारी आस्थापने असलेल्या भागात फिरकी पोलीस पथक असावेत त्याचप्रमाणे स्वतःच्या दुकानासाठी दुकान मालकाने सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे का याची खातरजमा प्रशासनाने करावी आणि आज जर अशी खातरजमा प्रशासनाने केली असती तर कदाचित हा खुनाचा प्रकार घडला नसता असे ते म्हणाले.
मडगाव पोलीस मडगावातील व्यापाऱयांना संरक्षण देण्यास अपुरे पडलेले आहेत हे स्पष्ट केले आणि मडगावातील व्यापाऱयांच्या सुरक्षिततेसाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच मडगावच्या आमदाराने प्रयत्न करावेत, अशी सुचना मनोहर रायकर यांनी केली.
रमाकांत रायकर
ब्रह्मदैवज्ञ वाजेकर रायकर फॅमिली ट्रस्टचे माजी अध्यक्ष तसेच दैवज्ञ समाज, मडगावचे उपाध्यक्ष रमाकांत रायु यांनी बुधवारच्या घटनेनंतर मडगावातील सुवर्ण व्यवसायिकांनी स्वतःच्या रक्षणासाठीची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे सुवर्ण पेढीत आत आलेल्या कोणालाही मालकाच्या संमतीविना बाहेर जाता येणार नाही अशी व्यवस्था करण्याचे आवाहन केले.
बुधवारी मडगावात ज्या पद्दतीने खून झाला त्याचपद्दतीने काही वर्षापूर्वी म्हापसा येथे कामाक्षी ज्वेलरीचे मालक रत्ना रायकर यांचा गोळी झाडून खून करण्यात आला होता. त्या खुनाचा अजून तपास लावण्यात गोवा पोलिसांना यश आलेले नाही अशी खंत रमाकांत रायकर यांनी व्यक्त केली आणि या खुनाचा तातडीने तपास लावावा अशी प्रशासनाकडे विनंती केली.
म्हापसा येथील एक समाजसेवक परेश रायकर यांनी ‘म्हापसा येथील रत्ना रायकर खून प्रकरणाचे उदाहरण दिले आणि स्वप्नील वाळके यांच्या मारेकऱयांना 48 तासात न पकडल्यास हेही प्रकरण त्याच दिशने जाऊ शकते’ असे सांगितले.