सलामी लढतीत विद्यमान विजेत्या चेन्नई सुपरकिंग्सला जोरदार पराभवाचा धक्का, अजिंक्य रहाणेची 44 धावांची लक्षवेधी खेळी
मुंबई / वृत्तसंस्था
महेंद्रसिंग धोनीने (38 चेंडूत 50) आयपीएलमध्ये 3 वर्षांनंतर पहिलेच अर्धशतक झळकावल्यानंतर देखील चेन्नई सुपरकिंग्सला सलामी लढतीत विद्यमान उपजेत्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. वानखेडे स्टेडियमवरील या लढतीत चेन्नईने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकात 5 बाद 131 धावा केल्या तर प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने 18.3 षटकात 4 बाद 133 धावांसह सहज विजय संपादन केला.
विजयासाठी 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर अजिंक्य रहाणेने 34 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 44 धावा जमवल्या तर सॅम बिलिंग्ज (25), श्रेयस अय्यर (नाबाद 20), नितीश राणा (21), वेंकटेश अय्यर (16) यांनी समयोचित योगदान दिले. श्रेयसने शेल्डॉन जॅक्सनसह (नाबाद 3) विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
प्रारंभी, नेतृत्वाचे ओझे उतरवलेल्या महेंद्रसिंग धोनीने 3 वर्षानंतर प्रथमच आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले. पण, यानंतरही केकेआरने चेन्नई सुपरकिंग्सला 5 बाद 131 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखून धरण्याचा पराक्रम गाजवला.
चेन्नई सुपरकिंग्सने केवळ धोनीच्या नाबाद अर्धशतकामुळेच 130 धावांचा टप्पा सर केला. नवनियुक्त कर्णधार रविंद्र जडेजाने 28 चेंडूत नाबाद 26 धावांचे योगदान दिले. धोनीने आयपीएल स्पर्धेतील आपले शेवटचे अर्धशतक 21 एप्रिल 2019 रोजी आरसीबीविरुद्ध नोंदवले. त्यावेळी त्याने 84 धावांची आतषबाजी केली होती.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (0) खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. त्याने उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्लीप कॉर्डनमधील नितीश राणाकडे सोपा झेल दिला. वानखेडेच्या टिपिकल ट्रकवर अपेक्षेप्रमाणे चेंडूला उत्तम बाऊन्स मिळाला आणि याचा केकेआरच्या गोलंदाजांनी उत्तम लाभ घेत चेन्नईला रोखून धरण्यात यश मिळवले.
डेव्हॉन कॉनव्हे (3) स्वस्तात बाद झाल्यानंतर रॉबिन उत्थप्पाने (21 चेंडूत 28) डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, या जोडीला केवळ 28 धावांची भागीदारी करता आली. कॉनव्हे हा उमेश यादवचा दुसरा बळी ठरला. उत्थप्पाने मावीच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण चढवत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र, वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर शेल्डॉन जॅक्सनने यष्टीचीत करत उत्थप्पाची खेळी संपुष्टात आणली. जडेजासमवेत रनिंग बिटविन द विकेटमध्ये गोंधळ उडाल्यानंतर रायुडूला धावचीत होत परतावे लागले.
ठरावीक अंतराने पडझड झाल्यामुळे चेन्नईचा निम्मा संघ 61 धावांमध्ये गारद झाला. नंतर जडेजा व धोनी यांनी सहाव्या गडय़ासाठी 70 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला होता. या आजी-माजी कर्णधारांनी केकेआरच्या गोलंदाजांचा उत्तम समाचार घेतला आणि त्यामुळे चेन्नईला शेवटच्या 10 षटकात 74 धावांची आतषबाजी करता आली होती.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स ः 20 षटकात 5 बाद 131 (धोनी 38 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह नाबाद 50, रविंद्र जडेजा 28 चेंडूत नाबाद 26, उत्थप्पा 21 चेंडूत 28. उमेश यादव 2-20).
केकेआर ः 18.3 षटकात 4 बाद 133 (अजिंक्य रहाणे 34 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 44, नितीश राणा 21, श्रेयस अय्यर नाबाद 20, सॅम बिलिंग्ज 25. डेव्हॉन ब्रेव्हो 3-20).