बॉस्फोरस मुष्टियुद्ध स्पर्धा : शिवा, सोनिया, परवीनसह उपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली : भारताची महिला बॉक्सर निखत झरीनने वर्ल्ड चॅम्पियन पाल्त्सेवा एकतेरिनाला पराभवाचा धक्का देत बॉस्फोरस मुष्टियुद्ध स्पर्धेत महिलांच्या 51 किलो वजन गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय शिवा थापा, सोनिया लाथेर, परवीन यांनीही आगेकूच केली आहे.
आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या झरीनने स्पर्धेच्या दुसऱया दिवशी धक्कादायक निकाल देताना रशियाच्या एकतेरिनाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. तिची पुढील लढतही अव्वल प्रतिस्पर्धीशी होणार असून कझाकची दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन कीझायबे नझीमचे आव्हान तिच्यासमोर असणार आहे. 2013 मध्ये आशियाई चॅम्पियन ठरलेला शिवा थापा, सोनिया लाथेर, परवीन यांनीही आपापल्या वजन गटात विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. शिवा थापाने पुरुषांच्या 63 किलो वजन गटात कझाकच्या स्मॅगुलोव्ह बघ्तियोव्हवर 3-2 अशी निसटत्या फरकाने मात केली. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकलेल्या सोनिया लाथेरने महिलांच्या 57 किलो वजन गटाच्या लढतीत आणि परवीनने महिलांच्या 60 किलो वजन गटाच्या दुसऱया फेरीतील लढतीत अनुक्रमे सुरमेनेली तुग्सेनाझ व ओझीओल इसराचा 5-0 याच फरकाने पराभव केला. दुर्योधन नेगी (69 किलो गट), ब्रिजेश यादव (81 किलो गट), क्रिशन शर्मा (91 किलोवरील गट) यांचे आव्हान मात्र प्राथमिक फेरीतच समाप्त झाले. तिसऱया दिवशी भारताचे सहा बॉक्सर्स रिंगणात उतरणार असून लाथेर, झरीन, परवीन, ज्योती (69 किलो) महिला विभागात तर थापा, गौरव सोळंकी पुरुष विभागात उपांत्यपूर्व लढत खेळणार आहेत.