बेळगावातील नाटय़विश्वाचे स्वत:चे स्थान निर्माण करणाऱया कॅपिटल वनच्या ‘एकांकिका’ स्पर्धांना गुरुवारपासून सुरूवात झाली. या स्पर्धांमध्ये विविध विषयांवरील आशयपूर्ण एकांकिकांचे सादरीकरण झाले. गुरुवारी म्हणजेच पहिल्या दिवशी सादर झालेल्या एकांकिकांना उपस्थित रसिकांचीदेखील उत्तम दाद मिळाली.
कॅपिटल वन सहकारी सोसायटीतर्फे येथील लोकमान्य रंगमंदिरामध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये बेळगावसह कोल्हापूर, सांगली, चंदगड, पुणे, सिंधुदुर्ग, गोवा राज्य येथून आलेल्या संघांनी सहभाग घेतला आहे. नाविन्यपूर्ण विषयांनी समृद्ध अशा नाटय़संहिता आणि त्यांचे दर्जेदार सादरीकरण ही या स्पर्धेची वैशिष्टय़े बनली आहेत. त्यामुळे या स्पर्धेचा सोहळा आता रंगतदार बनला आहे.