आरोग्यदूत अमेय कवळेकर याची निरंतर सेवा
दुर्गाप्रसाद पै/ शिरोडा
मानव जातीवर कोसळलेल्या कोरोना महामारीच्या संकटाशी समाजाच्या विविध स्तरातील घटक वेगवेगळय़ा पायऱयांवर झुंजत आहेत. त्यापैकी कुणी आघाडीवर तर कुणी दुसरी व तिसरी फळी लढविताना दिसतात. कोरोनाच्या या लढय़ात असेही काही योद्धे आहेत, जे पहिल्या लाटेपासून आत्तापर्यंत गेले वर्षभर अथकपणे लोकांना सेवा देताना आढळतात. फोंडा येथील आयडी म्हणजेच उपजिल्हा इस्पितळातील आरोग्य कर्मचारी अमेय गुरुदास कवळेकर हे त्यापैकीच एक आहेत. कोरोनाच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी स्वॅब नमूने घेण्याचे काम एकाच जागी उभे राहून ते गेले वर्षभर करीत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी साधारण 80 हजारहून अधिक लोकांचे नमुने घेतलेले आहे.
कोरोना चाचणीसाठी येणाऱया हजारो लोकांचे नमूने घेणाऱया अमेय याचा चेहरा नेहमीच झाकलेला असतो. मात्र या आणीबाणीच्या काळात त्याची सेवा निश्चित लपून राहत नाही. गेल्या नऊ वर्षांपासून फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात स्टाफ नर्स म्हणजेच ब्रदर म्हणून तो सेवेत आहे. सुरुवातीचा बराच काळ त्याने रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर्सचा प्रमुख साहाय्यक म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये घालवली. इस्पितळात येणाऱया रुग्णांना न कंटाळता व कुठलेच आढेवेडे न घेता सेवा देणारा हा तरुण उत्साही असा आरोग्यदूत कोरोना काळातही तेवढय़ाच तत्परतेने सेवा देत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात गोव्यात कोरोनाने ज्यावेळी शिरकाव केला, तेव्हा सामान्य लोक सोडाच पण डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारीही प्रचंड तणावाखाली होते. कोरोनाची बाधा कधी व केव्हा कुणाला होईल याची शाश्वती नव्हती. अनेक रोगांवर आत्मविश्वासाने उपचार करणारे डॉक्टर्स व रुग्णांना हाताळणाऱया परिचारिकाही भितीच्या छायेत होत्या. अशा अनामिक दहशतीच्या वातावरणात अमेयसारख्या काही निडर आरोग्य कर्मचाऱयांनी पहिल्या दिवसांपासून कोरोनाची ही पहिली आघाडी लढविण्याची तयारी ठेवली. फोंडय़ातील आयडी इस्पितळात चाचणीसाठी आलेला पहिला कोरोनारुग्ण त्याने हाताळला व पुढे तर चाचण्यांचे सत्रच सुरु झाले. दिवसाकाठी पाचशे लोकांच्या चाचण्या घेताना रात्री उशिरापर्यंत त्याने सेवा दिली. सुरुवातीच्या काळात एखाद्या गावात कोरोना रुग्ण आढळल्याचे वृत्त कानावर पडताच, संपूर्ण गाव हादरुन जायचा. या रुग्णाच्या घराजवळील रस्त्यावरुन जाण्यासही लोक दचकत होते. अशा दहशतीच्या छायेत अमेयने हजारो रुग्णांच्या चाचण्या घेतल्या.
अजूनही लढा सुरुच आहे
गेल्या वर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात गोव्यात कोरोना रुग्णांनी उच्चांक गाठला तेव्हा अमेयच्या कामाला उसंत नव्हती. सकाळी सुरु होणारे नमूने घेण्याचे काम कधी रात्री उशिरा, कधी संपेल याची शाश्वती नव्हती. सकाळी अंगावर चढवलेला पीपीई किट व मास्क उतरवून थोडासा वेळ मोकळा श्वास घेण्याएवढीही त्याला फुरसत मिळायची नाही. वेळेत जेवण नाही किंवा कामाचे तास संपले तरी घरी जाण्याची मुभा नाही अशा कठिण काळात त्याने कोरोना रुग्णांना सेवा दिली. कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही की, मित्रांसोबत मोकळा वेळ घालवता येत नाही. गेले वर्षभर एकही सुट्टी न घेता त्याची ही सेवा निरंतर सुरुच आहे. कुटुंबाने दिलेली साथ व फोंडा उपजिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांचे नैतिक पाठबळ यामुळे आपल्याला धीर मिळत आहे. इस्पितळातील सहकारी, डॉक्टर्स, स्वॅब गोळा करणारे इतर सहकारी, मॅट्रन तसेच प्रयोगशाळेतील तज्ञ यांचेही वेळोवेळी मिळणारे मोलाचे सहकार्य ही आपल्यासाठी जमेची बाजू असल्याचे अमेय सांगतो. विशेष म्हणजे आत्तापर्यंत हजारो कोरोना रुग्णांचे नमून घेऊनही आपण कोरोनापासून सुरक्षीत आहे.
कोरोना योद्धा हे बिरुद अभिमानास्पद
या सेवेमुळे आपल्याला कोरोना योद्धा म्हणून संबोधले जाणे ही भाग्याची गोष्ट आहे. कर्तव्य भावनेने स्वीकारलेली ही सेवा हा कठिण काळ संपेपर्यंत निरंतरपणे पुढे नेण्याची आपली तयारी आहे. आपल्या वैद्यकीय सेवेतील हा सर्वांत कठिण व आव्हानात्मक काळ असून आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक कर्मचारी व डॉक्टर्स त्याच सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. कोरोनाचे हे संक्रमण लवकरात लवकर ओसरण्यासाठी प्रत्येक नागरिकाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे. सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांचे गांभीर्याने पालन केल्यास कोरोना महामारीतून आपण लवकरात लवकर मुक्त होऊ अशी आशा त्याला वाटते.
कुटुंबासाठी वेळ मिळत नाही, तरीही निराशा नाही…
आपली मावशी शगन पेडणेकर यांच्या प्रेरणेमुळे आपण आरोग्य सेवा क्षेत्रात आलो. आरोग्य कर्मचारी ही नोकरी नसून ती सेवा आहे, असे आपण मानत असल्याने या कठिण काळातही मनाला निराशा जाणवत नाही. आपली पत्नी डॉ. श्रृती कवळेकर याही सध्या मडगाव येथे कोरोना सेवेत आहेत. त्यामुळे कुटुंबासाठी वेळच मिळत नाही. कौटुंबिक सोहळे व नातेवाईकांच्या गाठीभेटीही सध्या होत नाही. कामाच्या ठिकाणी बरेच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याने जबाबदारी वाढत आहे. माझ्या एकटय़ासाठीच नव्हे तर सर्व आरोग्य कर्मचाऱयांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे जीवनाची घडी थोडीशी विस्कळीत झालेली आहे, असे तो सांगतो.
अमेय कवळेकर हे सध्या ट्रेन्ड नर्सिस असोसिएशन ऑफ इंडिया गोवा राज्य शाखेचे नर्सिंग सर्विस अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.