खानापूरहून बेळगावला मोटारसायकलने येत असताना दुभाजकाला जोराची धडक दिल्याने दुर्घटना
वार्ताहर / किणये
बेळगाव-पणजी महामार्गावरील झाडशहापूर दुभाजकानजीक झालेल्या दुचाकी वाहन अपघातात गोकाक तालुक्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघाताची घटना बुधवारी रात्री 11.30 च्या दरम्यान घडली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
कुमार बसाप्पा कबाडगी (वय 19) व शिवानंद बसवराज कबाडगी (वय 21, दोघेही राहणार शिवापूर ता. गोकाक) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. या अपघाताची माहिती वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळाली आहे.
गोकाकमधील हे तरुण खानापूरला गेले होते. बुधवारी रात्री ते बेळगावला येत होते. रात्री अंधार असल्याने बेळगाव-पणजी महामार्गावर, झाडशहापूरजवळच्या दुभाजकाला त्यांच्या मोटारसायकलची जोराची धडक बसली. या अपघातात दोघेही तरुण जागीच ठार झाले असल्याची माहिती वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकातून उपलब्ध झाली आहे.
बेळगाव-पणजी, खानापूरपर्यंतच्या रस्त्याचे कामकाज सध्या जोमाने सुरू आहे. या रस्त्याचे कामकाज सुरू असतानाच सदर अपघाताची घटना घडली असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महामार्गाचे रुंदीकरण झाले आहे. या महामार्गावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवून ये-जा करण्याची गरज आहे. भरधाव वेगाने वाहन चालविल्यास अपघात होण्याचा धोका असल्याने खबरदारी घ्यावी, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.