काम पूर्ण झाल्यानंतर मिलिटरी महादेव मंदिराशेजारील रस्ता पुन्हा खुला : नागरिकांचा संभ्रम दूर
प्रतिनिधी /बेळगाव
शुक्रवारी सकाळपासून मिलिटरी महादेव मंदिराशेजारील रस्ता दिवसभर बंद ठेवण्यात आला होता. परिणामी वाहनधारकांची गैरसोय झाल्याने रस्ता बंद केल्याची अफवा पसरली होती. मात्र लष्करी छावणी परिसरातील झाडांच्या फांद्या रस्त्यावर आणि विद्युतवाहिन्यांवर लोंबकळत आहेत. धोकादायक फांद्या हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यामुळे रस्ता बंद झाल्याचा संभ्रम दूर झाला आहे.
लष्करी छावणी आणि कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते सर्वसामान्य नागरिकांना बंद ठेवण्यात आले होते. काही रस्ते अद्यापही बंदच आहेत. रस्ते खुले करण्यासाठी नागरिकांनी अनेकवेळा आंदोलने छेडली होती. काही रस्त्यांचा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. पण संरक्षण खात्यानेच कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रस्ते सर्वसामान्य नागरिकांना खुले करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे रस्ते खुले करण्यात आले आहेत. मात्र शुक्रवारी सकाळी मिलिटरी महादेव मंदिराशेजारील रस्ता काँगेस रोडपासून वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. याठिकाणी रस्त्यावर दगड ठेवून जवान तैनात करण्यात आले होते. तसेच वाहनधारकांना ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे रस्ता वाहतुकीस का बंद करण्यात आला, असा मुद्दा उपस्थित झाला. कॅम्प, शौर्य चौक आणि गांधी चौकात जाण्यासाठी हा रस्ता वाहनधारकांना सोयीचा असल्याने नागरिकांना वळसा घालून जावे लागले. सोयीचा रस्ता बंद ठेवल्याने हा रस्ता कायमचा बंद करण्यात आला का? अशी अफवा पसरली.
याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली असता, या रस्त्यावरील झाडांच्या फांद्या विद्युतवाहिन्यांवर कोसळत आहेत. तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनांना फांद्यांचा धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर लोंबकळणाऱया फांद्यांमुळे पावसाळय़ात रस्ता खराब होत आहे. त्यामुळे फांद्या हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याने रस्ता बंद ठेवण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली. झाडांच्या फांद्या हटविताना वाहनधारकांना धोका असल्याने रस्ता शुक्रवारी दिवसभर बंद ठेवला होता. फांद्या तोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता खुला करण्यात आला.