पाटणे – काणकोण येथील घटना, ताब्यात घेतलेला बछडा तीन महिन्यांचा
प्रतिनिधी / काणकोण
पाटणे-काणकोण येथील भरवस्तीमधील एका घरासमोरच्या झाडावर चढलेल्या बिबटय़ाच्या बछडय़ाची सुटका करून त्याला यशस्वीरीत्या ताब्यात घेऊन जीवदान देण्यात काणकोणच्या अभयारण्य विभागाला 9 रोजी यश आले. पाटणे परिसर सध्या पर्यटनस्थळ म्हणून पुढे येत असून या गजबजलेल्या भागातील घरासमोरच्या एका झाडावर बिबटय़ाचा बछडा चढून बसला, तर अन्य एक बछडा कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे पळून गेला, अशी माहिती पाटणे येथील रहिवाशांनी दिल्यानंतर अभयारण्य विभागाचे पथक त्वरित या ठिकाणी धावून आले.
एका घरासमोरच्या आंब्याच्या झाडावर बिबटय़ाचा बछडा चढला असल्याचे वृत्त कळताच बघ्यांची या ठिकाणी गर्दी झाली. त्याचवेळी काणकोणच्या अभयारण्य विभागाचे वनाधिकारी अनंत वेळीप आपल्या सहकाऱयांसह पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. लोकांची वाढलेली गर्दी पांगविण्यासाठी काणकोणचे पोलीस उपनिरीक्षक स्वदेश देसाई आपल्या सहकाऱयांसहित या ठिकाणी धावून आले. झाडाखाली अभयारण्य विभागाने जाळी मांडली होती. झाडाखाली वाढलेली गर्दी पाहून घाबरलेल्या बछडय़ाने खाली उडी मारली. त्यावेळी अभयारण्य विभागाच्या कर्मचाऱयांनी त्या बछडय़ाला ताब्यात घेतले, अशी माहिती वेळीप यानी दिली.
एक बछडा पळून गेला आहे. त्याचा तसेच बिबटय़ाच्या मादीचा शोध घेण्याकडे अभयारण्य विभागाचे कर्मचारी लक्ष देणार असल्याचे वेळीप यांनी स्पष्ट केले. अभयारण्य विभागाच्या ताब्यात असलेला बछडा तीन महिन्यांचा असून त्याची रवानगी कोठे करायची हे अजून ठरलेले नाही. सध्या सदर बछडा घाबरलेला आहे, अशी माहिती वेळीप यांनी दिली. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी पणसुले परिसरात रेल्वेखाली सापडून एका बिबटय़ाच्या मादीचा अंत झाला होता. मात्र ती मादी आणि या बछडय़ांचा संबंध नसल्याची माहिती त्यांनी दिली.