वार्ताहर / दाभाळ
दाभाळ, निरंकाल मुख्य रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी असलेल्या फणसांच्या झाडावर लटकणारे फणस पिकून रस्त्यावर पडत असल्याने वाहनचालकांना ते धोकादायक ठरू लागले आहेत. गेल्या वर्षी असाच एक फणस धावत्या दुचाकीवर पडल्याने त्यात दुचाकीस्वार जखमी झाला होता. त्यावेळी हा विषय चर्चेत आला होता, परंतु कुणीही गांभीर्याने घेतले नव्हते.
यंदाही या रस्त्याच्या बाजूला फणसाच्या झाडांना मोठय़ा संख्येने फणस लागले आहेत. गेल्या वर्षी घडलेल्या अपघाताची पुर्नरावृत्ती टाळण्यासाठी बेतोडा निरंकाल ग्रामपंचायत तसेच किर्लपाल दाभाळ पंचायतीने किंवा झाडाच्या मालकांनी हे फणस काढून टाकण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
फोंडा निरंकाल मार्गे दाभाळ येथे जाणाऱया मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या बाजूच्या झाडांना लटकणारे फणस वाहनांवर कोसळल्यास अपघात होण्याचा वाढता धोका आहे. दुचाकी चालकांना तर त्यापासून अधिक सावधगिरी बाळगावी लागत आहे. बऱयाच झाडांना एकाच ठिकाणी चार ते पाच फणस लटकताना दिसतात. सध्या हे फणस पिकून गळायला लागले आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेल्या या फणसाच्या झाडांना लागलेले असंख्य फणस दर वर्षी पिकून गळून रस्त्यावर पडतात. त्यामुळे रस्ताही निसरडा होतो. पावसाळय़ात हे चित्र या भागात जास्त पाहायला मिळते. निसरडय़ा रस्त्यावर वाहने घसरून पडण्याचा धोका आहे हे माहीत असून सुद्धा हे फणस झाडावरुन उतरविण्याची दक्षता कुणीच घेत नाही.