नावेली, नुवे येथेही रसत्यावर झाडे उन्मळून पडली
प्रतिनिधी / मडगाव
मूसळधार पाऊस आणि त्याचबरोबर सुसाटय़ाचा वारा यामुळे काणकोण -मडगाव दरम्यान तसेच नुवे येथे रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे कारवार -मडगाव रस्ता वाहतुकीसाठी मंगळवारी सायंकाळी उशिरा बराच वेळ बंद राहिला.
आगोंदजवळील लेपर्ड व्हॅली येथे रस्त्यावर एक झाड कोसळले. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहिला. त्याचप्रमाणे मडगाव -कारवार दरम्यानच्या रस्त्यावरील शेळेर येथेही मंगळवारी रात्री झाड कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद राहिला.
वादळी वाऱयामुळे मंगळवारी सायंकाळी नावेली येथेही रस्त्यावर एका गुलमोहराचे झाड कोसळल्यामुळे हा रस्ताही वाहतुकीसाठी बराच वेळ बंद राहिला.
नुवे येथील कार्मेल महाविद्यालयाजवळ एक झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकही बराच वेळ बंद होती.
अग्नी शमन दलाच्या जवानानी अनेक ठिकाणी धाव घेऊन रस्त्यावर कोसळलेली झाडे कापून रात्री उशिरापर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती रात्री उशिरा सुत्रानी दिली.