टिळकवाडी, उद्यमबागमध्ये सर्वाधिक फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
मुसळधार पावसाने रविवारी दुपारनंतर दाणादाण उडवून दिली. जोरदार झालेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागांमध्ये झाडे कोसळून वीजपुरवठा ठप्प झाला होता. सोमवारी सकाळपर्यंत हा वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न हेस्कॉमकडून करण्यात येत होता. झाडे पडल्यामुळे वीज खांब तसेच वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
टिळकवाडी येथे जीओएसमध्ये बिघाड झाल्यामुळे रात्री 3 पर्यंत दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. वडगावच्या पटवर्धन लेआऊट येथे 100 के. व्ही. ट्रान्स्फॉर्मरमध्ये पावसामुळे बिघाड झाला होता. उद्यमबाग येथील पै टीसीजवळ झाड कोसळल्याने विजेचे दोन खांब जमीनदोस्त झाले. शहापूर स्मशानभूमिनजीक फांदी पडल्यामुळे विजेचा एक खांब कोसळला. शहराच्या उत्तर भागातील शिवबसव नगर येथे एक झाड पडल्याने रात्री 12 वाजल्यापासून वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. सकाळी 8 वा. पुरवठा सुरळीत करण्यात आला.
शहराच्या पश्चिम भागात जास्त प्रमाणात नुकसान झाले. रविवारी रात्रीपर्यंत पावसाची संततधार सुरू असल्यामुळे दुरुस्तीच्या कामात व्यत्यय येत होता. सोमवारी सकाळपर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. रविवारी सायंकाळपासून वीजपुरवठा नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.
तालुक्मयातही वीजपुरवठा ठप्प तालुक्मयातील उचगाव भागामध्ये विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने रविवारी सायंकाळपासून वीजपुरवठा बंद होता. सोमवारी सकाळपर्यंत हेस्कॉमचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करीत होते. गोजगा, मण्णूर, आंबेवाडी, कडोली, येळ्ळूर भागातही रविवारी रात्री वीजपुरवठा नव्हता. मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्याने अनेकांचा संपर्क बंद झाला होता. त्यामुळे सकाळीच त्यांना मोबाईल चार्जिंग करावे लागले.