केंद्र सरकार 1 कोटी डोस खरेदी करणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नीडल फ्री (सुई-मुक्त) ‘झायकोव्ह-डी’ या कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत प्रतिडोस 265 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुजरातमधील झायडस कॅडिला या निर्मात्या वैद्यकीय कंपनीला 1 कोटी डोसची खरेदी ऑर्डर नुकतीच दिली आहे. लसनिर्मिती दृष्टिपथात आल्यानंतर या लसीच्या प्रत्यक्ष लसीकरणाची तारीख जाहीर केली जाऊ शकते. सद्यस्थितीत झायडस कॅडिला कंपनीच्या लसचे तीन डोस घेतल्यानंतर कोरोनापासून पुरेसे संरक्षण मिळू शकते. ही लस बारा किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना देण्यासाठी ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने आपत्कालीन मंजुरी दिली आहे. ही लस नीडल फ्री असल्याने फार्माजेट ऍप्लीकेटरच्या मदतीने त्वचेतून थेट शरीरात सोडली जाईल. झायकोव्ह-डीचे तिन्ही डोस 28 दिवसांच्या अंतरांनी दिले जाणार आहेत.
झायडस कॅडिला कंपनीची ‘झायकोव्ह-डी’ लस डीएनएद्वारे विकसित करण्यात आली आहे. डीएनएद्वारे विकसित केलेली ही जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस आहे. लसीकरण मोहिमेवेळी प्रत्येक व्यक्तीला लसचा एक डोस आणि त्यासाठी एक स्वतंत्र ऍप्लीकेटरचा वापर होणार आहे. केंद्र सरकार 3.57 डॉलरला म्हणजे 265 रुपयांना एक डोस या दराने लसचे एक कोटी डोस खरेदी करणार आहे. साहजिकच एका लाभार्थीचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी (प्रत्येकी तीन डोस) जवळपास 800 ते 1,100 रुपये खर्च करावे लागतील.
भारतात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसचे 109 कोटी 8 लाख 85 हजार 812 डोस टोचण्यात आले. देशातील 74 कोटी 36 लाख 35 हजार 676 जणांना पहिला डोस तर 34 कोटी 72 लाख 50 हजार 136 जणांना दुसरा डोस टोचण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकरणात सुमारे 88 टक्के डोस हे पुण्याच्या ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या कोव्हिशिल्ड लसीचे आहेत. उर्वरित डोस हे हैदराबादस्थित ‘भारत बायोटेक’ कंपनीच्या कोव्हॅक्सिनचे आहेत.
जेट इंजेक्टरद्वारे होणाऱया लसीचे फायदे
झायकोव्ह-डी ही लस सुईऐवजी जेट इंजेक्टरने टोचली जाणार आहे. याचा फायदा असा आहे की लसीकरणावेळी वेदना कमी होतात. जेट इंजेक्टर सामान्य इंजेक्शनप्रमाणे स्नायूंच्या आत जात नाही. दुसरा फायदा म्हणजे संसर्ग पसरण्याचा धोका सुईच्या इंजेक्शनपेक्षा खूपच कमी असतो. झायडस कॅडिलाची 3 डोसयुक्त लस ‘झायकोव्ह-डी’ला याच महिन्यात राष्ट्रीय कोरोनाविषाणू विरोधी लसीकरण कार्यक्रमात सामील केले जाणार आहे. यामुळे भारतात आता मुलांनाही लवकरच कोरोनाची लस मिळू शकणार आहे. तथापि मर्यादित उत्पादन क्षमतेमुळे प्रारंभी ही लस प्रौढांना दिली जाणार असल्याचे समजते.