12 वर्षांवरील मुलांनाही वापरता येणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
झायडस कॅडिलाच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाऊ शकते. तसेच 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व नागरिकांनाही देता येईल. झायडस कॅडिलाच्या कोरोना लसीला ‘झायकोव्ह-डी’ असे नाव देण्यात आले आहे. ही डीएनएवर आधारित जगातील पहिली स्वदेशी लस आहे. सरकारच्या तज्ञ समितीच्या शिफारशीनंतर डीसीजीआयने झायडस कॅडिलानिर्मित ‘झायकोव्ह-डी’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापरासाठी आपत्कालीन मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिननंतर ही दुसरी स्वदेशी लस आहे.
मागील काही आठवडय़ांपासून झायडस कॅडिला कंपनी आपल्या ‘झायकोव्ह-डी’ या डीएनएवर आधारित असलेल्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करत होती. त्यासाठी कंपनीने डीसीजीआयकडे रितसर अर्जसुद्धा केला होता. तोच अर्ज मंजूर करुन डीसीजीआयने ‘झायकोव्ह-डी’या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.