उपचारादरम्यान आपत्कालीन वापर होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) अहमदाबादस्थित औषध निर्माता झायडस कॅडिला यांच्या ‘विराफिन’ला आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्यावर वेळेत आणि योग्यपणे उपचार होणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत वैद्यकीय यंत्रणेला ‘विराफिन’ हा नवा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. झायडस कॅडिला यांनी कोविड-19 च्या उपचारासाठी ‘डीजीसीआय’कडे परवानगी मागितली होती. त्यानुसार ‘विराफिन’ला अनुमती देण्यात आली. ‘झायडस कॅडिला’चे पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2 बी किंवा पेगीहेप औषध 91.15 टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोविड-19 संसर्ग असलेल्या प्रौढ व्यक्तींमध्ये या औषधाच्या आपत्कालीन वापरामुळे मोठी मदत मिळत आहे.
प्रारंभीच्या टप्प्यातील मानवी चाचणी परीक्षणात औषधाचे आशादायक परिणाम मिळाले आहेत. अंतिम निकालातून वेळीच रुग्णांना हे औषध दिले तर रुग्ण अधिक लवकर बरा होण्यास आणि रोगाच्या प्रगत अवस्थेत दिसणारी गुंतागुंत टाळण्यास मदत करते. मानवी चाचणीत या औषधातून चांगले परिणाम मिळाल्यामुळे नव्या बाधितांवरही ते प्रभावी ठरणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीला औषध नियामकांकडून कोविडच्या रुग्णांवर तिसऱया टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती.