सरकारने उचलले पाऊल – लवकरच मुलांनाही मिळणार लस
वृत्तसंस्था / अहमदाबाद
झायडस कॅडिलाची 3 डोसयुक्त लस ‘झायकोव्ह-डी’ला याच महिन्यात राष्ट्रीय कोरोनाविषाणू विरोधी लसीकरण कार्यक्रमात सामील केले जाणार आहे. यामुळे भारतात आता मुलांनाही लवकरच कोरोनाची लस मिळू शकणार आहे. सरकारने अहमदाबाद येथील झायडस कॅडिला कंपनीला या लसींच्या एक कोटी डोसची ऑर्डर दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने देशातच विकसित जगातील पहिली डीएनए आधारित कोरोना लसप्रकल्पाचे प्रारंभिक कार्य सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. देशाच्या लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत ही लस प्रारंभी प्रौढांना दिली जाणार असल्याचे मानले जात आहे.
झायकोव्ह-डी ही भारताच्या औषध नियामकाकडून 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी मंजुरीप्राप्त पहिली लस आहे. झायकोव्ह-डीच्या एका डोसची किंमत सुमारे 358 रुपये असून यात कराचा समावेश नाही. या किमतीत एक डिस्पोजेबल जेट एप्लिकेटरची किंमत देखील सामील आहे. याच्या मदतीनेच लस देण्यात येते. मर्यादित उत्पादन क्षमतेमुळे प्रारंभी ही लस प्रौढांना दिली जाणार आहे.
कंपनी दर महिन्याला झायकोव्ह-डीचे एक कोटी डोस उपलब्ध करू शकते असे झायडस कॅडिलाच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. ही लस देण्यासाठी प्रंटलाईन वर्कर्स आणि कर्मचाऱयांना जेट एप्लिकेटरच्या वापराचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. कारण ही लस सुईने दिली जात नाही. झायकोव्ह-डीचे तिन्ही डोस 28 दिवसांच्या अंतरांनी देण्यात येतील. केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या विषय तज्ञ समितीने 12 ऑक्टोबर रोजी काही अटींसह 2-18 वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापराची मंजुरी देण्याची शिफारस केली होती.