ऑनलाईन टिम / पाकुर
झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात बुधवारी गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 16 जण ठार तर 26 जण जखमी झाले. गोविंदपूर-साहिबगंज राज्य महामार्गावर अमरापारा पोलीस स्टेशन हद्दीतील पडेरकोला गावात सकाळी 8.30 च्या सुमारास हा अपघात झाला. 40 प्रवाशांसह ही बस साहिबगंज जिल्ह्यातील बरहरवा येथून देवघर जिल्ह्यातील जसिडीहला जात होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना सुरुवातीला जिल्ह्यातील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. बसमध्ये अनेक लोक अडकले होते असून त्यांना गॅस कटरने गाडी फोडून बाहेर काढले जात होते, असे पोलिसांनी सांगितले.
भरधाव वेगात असणारे बस आणि ट्रक या परिसरात दाट धुक्यामुळे समोरासमोर धडकल्याचा संशय असून अपघाताची धडक एवढी होती की दोन्ही वाहनांचे पुढील भाग एकमेकांना निम्म्या भागापर्यंत आत गेले आहेत. सुदैवाने ट्रकमधील एकाही गॅस सिलिंडरचा स्फोट झाला नाही, अन्यथा या अपघातात आणखी अनेकांचे प्राण गेले असते, असे पोलिसांनी सांगितले. असे पोलिस अधिकारी विमल यांनी सांगितले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.