चिपळुणातील वीज चोरी प्रकरण, रक्कम भरण्यासाठी 48 तासांची मुदत
प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील उक्ताड येथील मरियम अपार्टमेंट या इमारतीमधील 12 सदनिकांना चोरून वीजपुरवठा केल्याचे उघडकीस आल्यानंतर महावितरण कंपनीने बिल्डरला नोटीस पाठवून बील आणि दंडासह एकूण साडेनऊ लाख रूपये भरण्यास सांगितले आहे. यासाठी मंगळवारपासून 48 तासांची मुदत देण्यात आली असून रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
शहरातील उक्ताड येथील मरियम अपार्टमेंट या इमारतीमधील तब्बल 12 सदनिकांना चोरून वीजपुरवठा सुरू असल्याचे शनिवारी महावितरण अधिकाऱयांनी उघडकीस आणले. या बाबत तेथील रहिवाशांनीच केलेल्या तक्रारीनुसार, ही कारवाई करण्यात आली असून आता यासंदर्भात महावितरणकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. नगर परिषद हद्दीत येणाऱया उक्ताड येथे मरियम अपार्टमेंट नावाने नवीन इमारत विकसित करण्यात आली आहे. मात्र या इमारतीला महावितरणकडून अधिकृत वीज पुरवठा देण्यात आलेला नाही. मात्र बांधकामासाठी देण्यात आलेल्या व्यवसायिक मीटरवरून थेट सर्व्हीस वायर टाकून मरियम इमारतीत वीज आणून त्यातील 12 सदनिकांमध्ये वीज पुरवठा देऊन अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू होता. या बाबत तेथील रहिवासी बिल्कीस नईम हळदे यांनी चिपळूण महावितरण कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार करत सुरू असलेल्या वीज चोरीमुळे विजेच्या वायर उघडपणे पार्किंगमध्ये सोडलेल्या असल्याने लहान मुले व नागरिकांना धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीनुसार शनिवारी महावितरणच्या अधिकाऱयानी भेट देऊन सुरू असलेली वीज चोरी उघडकीस आणली. त्यानुसार पंचनामाही केला.
महावितरणने केलेल्या चौकशीनुसार 6 महिन्यांपूर्वीच बांधकामासाठी व्यावसायिक मीटर देण्यात आला होता. त्या मीटरवरूनच ही चोरी करण्यात आली असल्याचे दिसले. त्यामुळे मीटर दिल्यापासून गेल्या 6 महिन्यातील बील रक्कम 8 लाख 33 हजार 94 अधिक 1 लाख 20 हजार तडजोड रक्कम असे एकूण 9 लाख 53 हजार 94 रूपये 48 तासांत भरण्याची नोटीस अहमद अब्दूल रहिमान मुकादम व गैसुद्दीन हसन चौगुले या दोघांच्या नावे सोमवारी सायंकाळी पाठवण्यात आली आहे. या बाबत महावितरणच्या अधिकाऱयांकडे संपर्क साधला असता 2 दिवसांनंतर दिलेली 48 तासांची मुदत संपुष्टात येणार आहे. या कालावधीत संबंधित बिल्डर्सने रक्कम न भरल्यास पोलीस स्थानकात रितसर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. त्यातील तडजोड रक्कम ही शासनाकडे भरणा केली जाणार आहे. शहरात एकाचवेळी अख्या इमारतीतील रहिवाशांना अशाप्रकारे वीज चोरून देण्याच्या प्रकारामुळे महावितरण कंपनी हे प्रकरण कसे हाताळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महावितरणकडून चौकशी
मुळातच चिपळूण-गुहागर मार्गावर लागून असलेल्या या इमारतीत वीज कनेक्शन नसतानाही तब्बल 12 सदनिकांत सुरू असलेला वीजपुरवठा नेमका कुणाच्या आशीर्वादाने होता, याची चर्चा सुरू झाली आहे. कारण प्रकरण उजेडात आल्यानंतर राजकीय पक्षाच्या काही युवा पदाधिकाऱयांनी धावाधाव सुरू केली होती. काहींच्या मते गेल्या 3 वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच आता हा प्रकार कधीपासून सुरू होता, कार्यालयातील कुणाकुणाचे दुर्लक्ष झाले, या सर्वांची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱयानी शहर कार्यालयाला दिल्या आहेत.