ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना केरळमध्ये गेल्या काही दिवसात झिका विषाणूंचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. आता पर्यंत 14 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या सोबतच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने तज्ज्ञांची एक टीम माहिती घेण्यासाठी पाठवली आहे.
या बाबत अधिक माहिती देताना केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, 6 सदस्यांची ही टीम असून ही टीम येथील परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला मदत करणार आहे. दरम्यान, केरळमधील 14 जणांचे अहवाल चाचणीसाठी पुण्यातील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. त्यात सर्व प्रथम एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर इतरांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता.
दुसरीकडे, केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनीही तातडीची पावले उचलली असून सर्व जिल्ह्यांना झिका व्हायरसबाबत सूचना दिल्या आहेत. एडीस जातीचे मच्छर चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. त्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि इतर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- झिका विषाणूची लक्षणे :
ताप येणे, अंग दुखणे, तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे हे झिका विषाणूची प्राथमिक लक्षणे आहेत. या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवतो. ही लक्षणे दोन ते सात दिवसापर्यंत कायम राहतात. असं असलं तरी सुरुवातीला आलेल्या तापावरून झिका विषाणूची लागण झाल्याचे सांगणे कठीण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन निदान करणे आवश्यक आहे.