वृत्तसंस्था/ बेलफास्ट
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार व यष्टिरक्षक-फलंदाज बेन्डान टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. आयर्लंडविरुद्ध सोमवारी होत असलेला सामना आपला शेवटचा सामना असल्याचे त्याने सांगितले.
टेलरने 2004 मध्ये लंकेविरुद्धच्या वनडेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि नंतर झिम्बाब्वेच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असा लौकीकही त्याने मिळविला. ‘सोमवारचा सामना हा माझा शेवटचा सामना असेल, हे जड अंतःकरणाने मी जाहीर करीत आहे. गेल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले, पण त्यात मी बदल करू शकत नाही,’ असे त्याने ट्विटर संदेशात म्हटले आहे. ‘संघासाठी उत्तम योगदान देणे, हेच माझे आजरवचे ध्येय राहिले आहे आणि आजवरच्या कारकिर्दीत त्यात मी यशस्वी ठरलोय, असे मला वाटते,’ असेही त्याने म्हटले आहे. 34 वर्षीय टेलरने झिम्बाब्वे क्रिकेट, संघसहकारी, कुटुंबीय आणि चाहत्यांचे भावपूर्ण शब्दांत आभार मानले. टेलरने 204 वनडे सामन्यांत 6677 धावा जमविल्या असून झिम्बाब्वेचा सर्वाधिक धावा जमविण्याचा विक्रम नोंदवणाऱया अँडी फ्लॉवरपेक्षा तो केवळ 112 धावांनी मागे राहिला.