वृत्तसंस्था /मुंबई
झी एन्टरटेनमेन्टचे समभाग सद्यकाळात शेअर बाजारात सर्वाधिक चर्चेत आले आहेत. कारण एका आठवडय़ात जवळपास झी एन्टरटेनमेन्टचे समभाग 90 टक्क्यांनी वधारले आहेत. मागील आठवडय़ात समभाग 186 रुपयाच्या मूल्यावर बंद झाले होते. नुकताच हा समभाग 337 रुपयावर बंद झाला होता. साधारणपणे 355 रुपयापर्यंत समभाग गेला होता. येत्या काळात यांचे बाजारमूल्य हे तब्बल 70 हजार कोटी रुपयावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोनीसोबत व्यवहार
झी एन्टरटेनमेन्टने सोनी पिक्चरसोबत व्यवहार करणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये कंपनीचे समभाग आजघडीला 32 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारले आहेत. एलारा कॅपिटलने आपल्या अहवालात, कंपनीचे बाजारमूल्य 100 टक्क्यांपेक्षा अधिकने वाढण्याचा अंदाज बांधला आहे. सर्वात मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी फायदा करून घेतला आहे. मागील आठवडय़ात जेव्हा झी एन्टरटेनमेन्टचे गुंतवणूकदार इन्वेस्कोने मंडळातून पुनीत गोयंका यांना बाजूला करण्याची मागणी केली होती, तेव्हा झुनझुनवाला यांनी 220 रुपयांना समभाग खरेदी केला होता.