नवीन कंपनीत संचालकांची संख्या 9 राहणार – लवकरच कंपनी लिस्टेड होणार
मुंबई
झी एन्टरटेनमेन्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाने सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियासोबत हातमिळवणी केली असून या अधिग्रहणाला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन कंपनीमध्ये सोनीची हिस्सेदारी ही 50.86 टक्के राहणार असून झीच्या प्रमोटर ग्रुप एस्सेलजवळ 3.99 टक्के हिस्सेदारी राहणार असल्याची माहिती आहे. यासोबतच झीच्या शेअर होल्डर्सजवळ 45.15 टक्के हिस्सा राहणार आहे.
अधिग्रहणाचे मूल्य जवळपास 52100 कोटी रुपये होणार असले तरी बाजारातील तज्ञांनी जितकी अपेक्षा मूल्याची केली होती त्यामध्ये हा आकडा कमी असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये अधिग्रहणाची घोषणा 22 सप्टेंबर 2021 रोजी केली होती. 90 दिवसांमध्ये डय़ू डिलिजेंस कालावधी 21 डिसेंबर रोजी समाप्त झाला आहे.
झी जवळ सध्याच्या काळात 96.05 कोटी समभाग आहेत, अधिग्रहणानंतर त्यांची हिस्सेदारी वाढून 173.63 कोटी होणार आहे. प्रमोटर 3.99 टक्के हिस्सेदारी कायम ठेवण्यासाठी नवीन कंपनीमध्ये 300 रुपये प्रति समभागाच्या हिशोबाने 3.67कोटीपेक्षा अधिकचे समभाग खरेदी करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पब्लिक शेअरहोल्डर्सला नवीन कंपनीमध्ये झीचे 100 समभागांच्या बदल्यात 85 समभाग मिळणार असल्याचे सांगितले जाते.
करारावर स्वाक्षरी
दोन्ही कंपन्यांनी बाइंडिंग ऍग्रीमेन्टवर स्वाक्षरी केली आहे. बाइंडिंग ऍग्रीमेन्टचा अर्थ झीचे अधिग्रहण फक्त सोनीसोबत होणार असा आहे. या अगोदर 90 दिवसांसाठी दोन्ही कंपन्यांमध्ये नॉन बाइंडिंग अग्रीमेन्ट होते. याचा अर्थ दोन्ही कंपन्यांनी ठरविले तर दोन्ही कंपन्या 90 दिवसांच्या कालावधीत माघार घेऊ शकले असते. परंतु दोन्हीकडून झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर या हातमिळवणीला हिरवा कंदील मिळाला आहे.
गोयंका एमडी व सीईओ
नवीन कंपनीच्या संचालकांची सदस्य संख्या ही 9 राहणार असून यात पाच अधिकारी राहणार आहेत. पुनीत गोयंका पाच वर्षांसाठी एमडी व सीईओ राहणार आहेत. अधिग्रहणाच्या प्रक्रियेनंतर कंपनी शेअर बाजारात लिस्टेड होणार आहे.