न्यूझीलंडचा वनडेत सर्वोच्च धावांचा पाठलाग, श्रेयस अय्यरच्या वनडे शतकावर रॉस टेलरची आक्रमक खेळी भारी
हॅमिल्टन / वृत्तसंस्था
श्रेयस अय्यरच्या (107 चेंडूत 103) वनडेतील पहिल्यावहिल्या शतकानंतरही रॉस टेलरचा झंझावात मैदानावर अवतरल्यानंतर यजमान न्यूझीलंडने 4 गडी राखून रोमांचक विजय संपादन केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 347 धावांचा डोंगर जरुर रचला. पण, त्यानंतर न्यूझीलंडने 48.1 षटकात 6 बाद 348 धावा जमवत अंतिमतः वर्चस्व गाजवले. या विजयासह यजमान संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय क्रिकेटमधील नवा तारा म्हणून उदयास येत असलेल्या श्रेयस अय्यरने जरुर शतकी खेळी साकारली. पण, या लढतीत रॉस टेलरचा 84 चेंडूतील 109 धावांचा झंझावात अधिक परिणामकारक ठरला. त्याच्या धुवांधार आतषबाजीमुळेच न्यूझीलंडने 348 धावांचे आव्हान 48.1 षटकात पार केले. 10 चौकार व 4 षटकारांसह टेलरचा झंझावात रोखणे एकाही भारतीय गोलंदाजाला शक्य झाले नाही. टी-20 मालिकेत 0-5 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर न्यूझीलंडने मारलेली ही मुसंडी अर्थातच लक्षवेधी ठरली.
टेलरचे 21 वे शतक
रॉस टेलरसाठी कारकिर्दीतील हे 21 वे शतक ठरले. याशिवाय, हंगामी कर्णधार टॉम लॅथमने 48 चेंडूत 69 धावांची आतषबाजी केली. रॉस टेलर व टॉम लॅथम या जोडीने 138 धावांची भरभक्कम भागीदारी साकारली. हेन्री निकोल्सने देखील 82 चेंडूत 78 धावा फटकावल्या. विजयासाठी 348 धावांचे आव्हान असताना मार्टिन गप्टील (32) व निकोल्स (78) यांनी 85 धावांची सलामी नोंदवली. गप्टील सर्वप्रथम बाद झाला. त्यानंतर पदार्पणवीर टॉम ब्लंडेल (9) कुलदीपच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाल्यावर टेलरचे क्रीझवर आगमन झाले आणि त्याने तिसऱया गडय़ासाठी निकोल्ससमवेत 62 धावा जोडल्या.
भारताकडून 29 अवांतर धावा
भारतीय गोलंदाजांनी येथे चक्क 29 अवांतर धावा दिल्या. शिवाय, खराब क्षेत्ररक्षणामुळे आणखी अडचणीत भर पडली. भारताला ब्रेकथ्रू मिळवण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. कोहलीने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत निकोल्सला धावबाद केल्यानंतरच ही कोंडी फुटली. यानंतर टेलर व लॅथम या जोडीने जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याचे धोरण अवलंबले आणि ते त्यात यशस्वी देखील झाले. लॅथमने 11 चेंडूत 3 अशी बचावात्मक सुरुवात केली होती. पण, नंतर त्याने 27 चेंडूतच 50 धावा कुटल्या. जसप्रित बुमराह (0-53) दुसऱया स्पेलमध्ये अधिक महागडा ठरला.
अय्यरचे शतक, केएल राहुलचे अर्धशतक
प्रारंभी, श्रेयस अय्यरने 107 चेंडूत 11 चौकार, 1 षटकारांसह 103 धावा फटकावल्या तर केएल राहुलने 64 चेंडूत 88 धावा झोडपल्या. पृथ्वी शॉ व मयांक अगरवाल या सलामीवीरांना मात्र 48 चेंडूत 50 धावा जमवल्यानंतर 5 चेंडूंच्या अंतरातच बाद व्हावे लागले. ते बाद झाल्यानंतर भारताची 2 बाद 54 अशी स्थिती होती. शॉने ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर झेल दिला तर अगरवालने टीम साऊदीच्या गोलंदाजीवर पॉईंटकडे झेल देत तंबूचा रस्ता धरला. कोहली व अय्यर यांनी तिसऱया गडय़ासाठी 102 धावांची भागीदारी साकारली.
कोहली ईश सोधीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मात्र, अय्यरने त्यानंतर धमाका सुरु केला आणि 66 चेंडूत अर्धशतक साजरे केल्यानंतर आणखी आक्रमक फलंदाजीवर भर दिला. अय्यर व राहुल जोडीने चौथ्या गडय़ासाठी 136 धावांची भर घातली. राहुलने 6 षटकार व 3 चौकार फटकावले. त्याच्या झंझावातामुळेच न्यूझीलंडला शेवटच्या 20 षटकात 191 धावांचे मोल मोजावे लागले होते.
धावफलक
भारत : पृथ्वी शॉ झे. लॅथम, गो. ग्रँडहोम 20 (21 चेंडूत 3 चौकार), मयांक अगरवाल झे. ब्लंडेल, गो. साऊदी 32 (31 चेंडूत 6 चौकार), विराट कोहली त्रि. गो. सोधी 51 (63 चेंडूत 6 चौकार), श्रेयस अय्यर झे. सॅन्टनर, गो. साऊदी 103 (107 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), केएल राहुल नाबाद 88 (64 चेंडूत 3 चौकार, 6 षटकार), केदार जाधव नाबाद 26 (15 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार). अवांतर 27. एकूण 50 षटकात 4 बाद 347.
गडी बाद होण्याचा क्रम
1-50 (पृथ्वी शॉ, 7.6), 2-54 (मयांक, 8.4), 3-156 (विराट, 28.4), 4-292 (45.3).
गोलंदाजी
साऊदी 10-1-85-2, बेनेट 10-0-77-0, ग्रँडहोम 8-0-41-0, जेम्स नीशम 8-0-52-0, मिशेल सॅन्टनर 10-0-58-0, ईश सोधी 4-0-27-1.
न्यूझीलंड : मार्टिन गप्टील झे. जाधव, गो. ठाकुर 32 (41 चेंडूत 1 चौकार), हेन्री निकोल्स धावचीत (कोहली) 78 (82 चेंडूत 11 चौकार), ब्लंडेल यष्टीचीत राहुल, गो. कुलदीप 9 (10 चेंडूत 1 चौकार), रॉस टेलर नाबाद 109 (84 चेंडूत 10 चौकार, 4 षटकार), टॉम लॅथम झे. शमी, गो. कुलदीप 69 (48 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), नीशम झे. जाधव, गो. शमी 9 (14 चेंडूत 1 चौकार), ग्रँडहोम धावचीत (अय्यर-कोहली) 1 (2 चेंडू), मिशेल सॅन्टनर नाबाद 12 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 29. एकूण 48.1 षटकात 6 बाद 348.
गडी बाद होण्याचा क्रम
1-85 (गप्टील, 15.4), 2-109 (ब्लंडेल, 19.1), 3-171 (निकोल्स, 28.3), 4-309 (लॅथम, 41.4), 5-328 (नीशम, 45.2), 6-331 (ग्रँडहोम, 45.6).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 10-1-53-0, शमी 9.1-0-63-1, शार्दुल ठाकुर 9-0-80-1, रविंद्र जडेजा 10-0-64-0, कुलदीप यादव 10-0-84-2.
अन कुलदीपने सांडलेला झेल भारताच्या जिव्हारी लागला!
या लढतीत रॉस टेलर भारतासाठी प्रचंड कर्दनकाळ ठरला आणि आश्चर्य म्हणजे याच रॉस टेलरला डावाच्या प्रारंभीच मोठे जीवदान मिळाले. डावातील 23 व्या षटकात रविंद्र जडेजा गोलंदाजी करत असताना रॉसचा स्वीपचा एक फटका चुकला आणि चेंडू यावेळी बराच वेळ हवेत होता. पण, शॉर्ट फाईनवरुन मागे धावत जाताना कुलदीपला अंदाज घेता आला नाही आणि त्याने दिलेले सोपे जीवदान भारताला भलतेच महागडे ठरले. रॉस टेलर यावेळी 16 चेंडूत अवघ्या 10 धावांवर खेळत होता.
षटकनिहाय धावसंख्या
संघ / 15 षटके / 30 षटके / 40 षटके / 50 षटके
भारत / 2-79 / 3-162 / 3-251 / 4-347
न्यूझीलंड / 0-83 / 3-175 /3-292 / 6-348 (48.1)
संथ गोलंदाजीबद्दल भारताला पुन्हा दंड
भारतीय क्रिकेट संघाला बुधवारी सलग तिसऱयांदा संथ गतीने गोलंदाजी केल्याबद्दल दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. निर्धारित वेळेत भारताने 4 षटके कमी टाकली होती. त्यामुळे, संघाला प्रत्येक षटकासाठी 20 टक्के असा एकूण 80 टक्के दंड केला गेला. मॅच रेफ्रींच्या आयसीसी इलाईट पॅनेलने या कारवाईची घोषणा केली. कोहलीने संथ गोलंदाजीची कबुली दिल्यानंतर स्वतंत्र सुनावणीची आवश्यकता भासली नाही, असे आयसीसीने पत्रकाद्वारे नमूद केले. भारताला यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे 1 व 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या चौथ्या व पाचव्या टी-20 सामन्यात देखील 40 टक्के व 20 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावला गेला होता.
संघ वाऱयावर, न्यूझीलंडचे प्रशिक्षक सहलीवर!
न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड भारताविरुद्ध मालिका सुरु असताना मध्यातच चक्क सुटीसाठी निघून गेले असून यामुळे न्यूझीलंडच्या क्रिकेट वर्तुळात वादंग सुरु झाले. पण, क्रिकेट न्यूझीलंड मंडळाने स्टीड यांचे समर्थन केले आहे. स्टीड यांची कुटुंबासमवेतची सहल पूर्वनियोजित होती, असे मंडळाचे व्यवस्थापकीय अधिकारी डेव्हिड व्हॉईट यांनी नमूद केले. सातत्याने क्रिकेट दौरे होत असताना, भरगच्च कार्यक्रमामुळे खेळाडूंना, साहायक पथकाला अशी सुटी घ्यावीच लागते, असे ते म्हणाले.