वाहतुकीलाही निर्माण झाला धोका, अग्नीशामक दलाचे चार तास खर्ची
प्रतिनिधी/ वास्को
सुक्या करडाला आग लागण्याच्या घटनांना सुरवात झाली आहे. त्यामुळे अग्नीशामक दलांची धावधाव सुरू झालेली असून गुरूवारी दुपारी झुआरीनगरात करडाने पेट घेतल्याने अग्नीशामक दलांना सुमारे चार तास कष्ट घ्यावे लागले. या घटनेने चौपदरी महामार्गावरील वाहतुकीसमोरही धोका निर्माण केला.
झुआरीनगरातील झुआरी इंडियन ऑईल टँकिंग लिमिटेडच्या इंधनाच्या टाक्याजवळील पठारावरील करडाने गुरूवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास पेट घेतल्याने घबराट उडाली. वाऱयामुळे हे करड अधिक वेगाने भडकत होते. त्यामुळे धुरासह आगीचे लोळ उठत होते. या आगीची झळ तेथील महामार्गावरील वाहतुकीलाही बसू लागल्याने या मार्गावरील वाहतुकीतही व्यत्यय आला. वाहन चालकांमध्ये भिती पसरली. जवळच इंधनाच्या टाक्या असल्याने धोक्यात अधिकच भर पडली होती. त्यामुळे वास्कोतील शासकीय अग्नीशामक दल तसेच झुआरी कंपनीचे अग्नीशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ही आग रोखण्यात यश मिळवले. आग पूर्णपणे नष्ट करण्यात यश आल्याने ही आग्नीशामक दले माघारी परतली असता. परंतु दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी करडाने पेट घेतल्याने पुन्हा प्रसंग उद्भभवला. त्यामुळे वेर्णातील शासकीय अग्नीशामक दलाने धाव घेऊन हे संकट संध्याकाळी चार वाजेपर्यंत दूर केले. पावसाळा संपल्याने आता ठिकठिकाणचे सुके करड पेट घेण्याचे दिवस सुरू झालेले आहेत. हल्लीच अशा काही घटना घडल्या. त्यात गुरूवारच्या घटनेमुळे अग्नीशामक दलाला बरेच कष्ट घ्यावे लागले. वास्कोतील सडा, बोगदा परीसरात तसेच चिखली, दाबोळी, झुआरीनगर, सांकवाळ, वेर्णा अशा भागात करड पेटण्याच्या घटना वारंवार घडत असतात.