प्रतिनिधी/ वास्को
सांकवाळ झुआरीनगर येथील महामार्गावर दुचाकी व इंधनवाहू टँकर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. मयत दुचाकी चालक युवकाचे नाव संदीप शर्मा (23) असे असून दाबोळी भागातील राहणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयत संदीप शर्मा हा युवक वेर्णा औद्योगीक वसाहतीत कामाला होता. कामावर रूजू होण्यासाठी वेर्णाच्या दिशेने जाताना त्याला अपघात झाला. हा अपघात काल सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास झुआरीनगरच्या पाठारावरील झुआरी इंडियन ऑईल टँकिंगसमोर झाला. मयत युवक आपल्या केटीएम दुचाकीवरून वेर्णाच्या दिशेने जात होता तर याच वेळी विरूध्द दिशेने येणाऱया इंधनवाहू टँकरने झुआरी इंडियन ऑईल टँकिंगमध्ये प्रवेश करण्यासाठी या आस्थापनाच्या दिशेने टँकर वळवला. मात्र, हा टँकर जवळपास रस्ता ओलांडून गेलेला असताना दुचाकी चालकाने या टँकरला जोरदार धडक दिली. टँकरला पाहून थांबण्याच्या प्रयत्न त्याचे दुचाकीवरील नियंत्रण गेले व त्याने टँकरला धडक दिली. यावेळी त्याचे डोके टँकरला आदळल्याने गंभीर इजा होऊन त्याला जागीच मृत्यू आला.
वेर्णाचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण सिमेपुरूषकर यांनी या अपघाताचा पंचनामा केलेला असून ते या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.