प्रतिनिधी/ वास्को
झुआरीनगरातही आता कंटेनमेंट झोनला विरोध होऊ लागला आहे. या वस्तीतील नागरिकांनी रविवारी सकाळी मोठय़ा संख्येने एकत्र येऊन वस्तीवरील निर्बंध उठवण्याची जोरदार मागणी केली.
काल रविवारी दुपारी बाराच्या सुमारास सुमारे अडीचशे लोक झुआरीनगरातील उमीया वसाहतीनजीकच्या नाकाबंदीच्या ठिकाणी एकत्र आले व त्यांनीही मांगोरहिल कंटेनमेंट झोनमधील नागरीकांप्रमाणेच कंटेनमेंट झोनच्या निर्बंधांना विरोध करीत हे निर्बंध शिथील करण्याची मागी केली. कंटेनमेंट झोनच्या निर्बंधांमुळे आमच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होत असल्याच्या तक्रारी या लोकांनी उपस्थित अधिकाऱयांकडे केल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनमधील बहुतेक सर्व लोक दिसवढा कमावण्यासाठी सकाळी घराबाहेर पडून संध्याकाळी घरी येत असतात. मात्र सध्या या वस्तीबाहेर जात येत नसल्याने लोकांसमोर आर्थिक समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. कंपनीमध्ये कामाला जाणाऱयांनाही वेतन मिळत नाही. त्यामुळे कामांवर जाणाऱया आणि कामांवरून येणाऱया लोकांसाठी सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास रस्ता खुला ठेवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच झुआरी कंपनीतील अनेक कामगारांना कोरोना बाधा झालेली असताना तो उद्योग खुला का ठेवण्यात आला आहे असा प्रश्नही त्यांना उपस्थित केला. या वस्तीत किराणा दुकाने तसेच एटीएमसारखी सेवा खुली ठेवण्यात यावी अशी मागणी या लोकांनी केली आहे.
मुरगाव मामलेदार कार्यालयातील संयुक्त मामलेदार कृष्णा गावस तसेच गिरेंद्र बाणावलीकर यांच्यासमोर त्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या. यावेळी पोलिसांनीही परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. अधिकाऱयांनी यावेळी किराणा दुकाने खुले ठेवण्यासाठी परवानगी दिलेली असल्याचे सांगितले तसेच चाचणीसंबंधी ज्या काही तक्रारी आहेत, त्याची दखल घेण्यात आलेली असल्याचे सांगितले. मात्र, या कंटेनमेंट झोन वस्तीत मोठय़ा प्रमाणात लोक एकत्र आल्याने कोरोना अधिक प्रमाणात फैलावण्याचा धोका निर्माण झालेला आहे.