लखनौ / वृत्तसंस्था
सामनावीर झुलन गोस्वामीचे 4 बळी व स्मृती मानधनाच्या 80 धावांच्या धमाकेदार खेळीमुळे भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकन महिला संघाविरुद्ध दुसऱया वनडेत 9 गडी राखून एकतर्फी विजय संपादन केला व 5 सामन्यांची ही मालिका 1-1 फरकाने बरोबरीत आणली. प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकन संघाचा डाव 41 षटकात 157 धावांमध्येच गुंडाळला तर प्रत्युत्तरात भारताने 28.4 षटकात केवळ एका गडय़ाच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.
38 वर्षीय झुलन गोस्वामीने 10 षटकात 42 धावात 4 बळी असे पृथक्करण नोंदवले आणि तिला मानसी जोशी (2-23), डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड (3-37) यांची पूरक साथ लाभली. यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकन महिला संघाचा डाव केवळ 157 धावांमध्येच गुंडाळला. भारतीय महिला संघाने येथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
सलामीवीर स्मृती मानधना (64 चेंडूत नाबाद 80) व पूनम राऊत (89 चेंडूत नाबाद 62) यांनी दुसऱया गडय़ासाठी 138 धावांची अभेद्य भागीदारी साकारली आणि यामुळे भारताने 28.4 षटकातच विजयाचे लक्ष्य गाठले. यापूर्वी पहिल्या वनडेत भारताला 8 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची संघाने येथे पुरेपूर भरपाई केली. स्मृतीने 10 चौकार व 3 षटकार फटकावले तर पूनम राऊतने देखील दुसरी बाजू लावून धरत 8 चौकार वसूल केले.
सलग दोन षटकारांची आतषबाजी
मानधनाने शबनीम इस्माईलच्या (1-46) गोलंदाजीवर सलग दोन षटकार खेचत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. वास्तविक, पाचव्या षटकात जेमिमा रॉड्रिग्ज (19 चेंडूत 8) लवकर बाद झाल्याने भारतीय महिला संघाची खराब सुरुवात झाली होती. पण, नंतर मानधना व राऊत यांनी विजयाच्या दिशेने जोरदार आगेकूच केली. स्वस्तात बाद होणाऱया रॉड्रिग्जने बाहेर जाणारा चेंडू यष्टीवर ओढवून घेतला होता.
रॉड्रिग्ज पुन्हा स्वस्तात गारद
भारतीय महिला संघ वर्षभरापासून व्यावसायिक क्रिकेटपासून दूर आहे. पण, आश्चर्य म्हणजे वर्षभरापूर्वी क्रिकेट ठप्प होण्यापूर्वी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत देखील रॉड्रिग्ज खराब फॉर्ममध्येच होती. ती बाद झाल्यानंतर राऊतने जम बसवण्यासाठी किंचीत अवधी घेतला. स्मृती मानधना मात्र प्रारंभापासूनच धावफलक हलता ठेवण्यात कमालीची यशस्वी ठरली. मानधनाने आऊटसाईड ऑफस्टम्पवरील चेंडू थर्डमॅनच्या दिशेने पिटाळले तर आखूड टप्प्याच्या चेंडूंचा देखील तितक्याच ताकदीने समाचार घेतला. तिचे कव्हर्सच्या दिशेने फटकावलेले ड्राईव्ह व लेटकटचे नजाकतदार फटके देखील तितकेच लक्षवेधी ठरले.
राऊतला डावातील 15 व्या षटकात उत्तम सूर मिळाला. तिने मलाबाच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल करत आपल्याला सूर सापडल्याचे दाखवून दिले. 20 व्या षटकात स्मृतीने सलग चौकार फटकावत अगदी थाटात अर्धशतक साजरे केले. अगदी 29 व्या षटकात विजयी चौकार देखील तिनेच खेचला.
द. आफ्रिकेतर्फे गुडॉलची फटकेबाजी
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकन संघाच्या डावात लारा गुडॉल सर्वात यशस्वी महिला फलंदाज ठरली. तिने 49 चेंडूत 77 धावांची आतषबाजी केली. कर्णधार सुने लूस हिनेही 36 चेंडूत जलद 57 धावा फटकावल्या. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर झुलन गोस्वामी, मानसी जोशी यांनी नियंत्रित मारा केला आणि लिझेली ली (4), लॉरा वोल्वार्ल्ड (9) यांना स्वस्तात बाद करण्यात त्यांना यश प्राप्त झाले. लूस व गुडॉल यांनी 60 धावा जोडल्या. मात्र, मानसी जोशीने 21 व्या षटकात दक्षिण आफ्रिकन कर्णधार लूसला बाद केले.
दीप्ती शर्मा (6 षटकात 0-20) व राजेश्वरी गायकवाड (9 षटकात 3-37) यांनी सातत्याने भेदक मारा साकारत दक्षिण आफ्रिकन संघावर उत्तम वर्चस्व राखले. 26 व्या षटकात राजेश्वरीच्या एका फ्लायटेड चेंडूवर मिग्नॉन डय़ू प्रीझ (11) कव्हरवरील दीप्तीकरवी झेलबाद झाली.
मितालीचे कल्पक बदल
भारतीय कर्णधार मिताली राजने गोलंदाजीत कल्पक बदल केले आणि त्याचा संघाला उत्तम लाभ झाला. गोस्वामीने मेरिझेन कॅप्पला (10) बाद केले तर उपकर्णधार हरमनप्रीत कौरने गुडॉलला बाद केले. या पडझडीमुळे द. आफ्रिकेची 6 बाद 130 अशी दैना उडाली. 38 व्या षटकात गोस्वामीने दुहेरी यश प्राप्त करताना नॅदिने क्लर्क (8) व शबनीम इस्माईल (0) यांना तंबूचा रस्ता दाखवला व दक्षिण आफ्रिकेचा डाव 8 बाद 144 असा आणखी गडगडला. चेट्टीला गायकवाडने बाद केले. शिवाय, मलाबाला देखील तिनेच तंबूचा रस्ता दाखवला.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिकन महिला संघ ः 41 षटकात सर्वबाद 157 (लारा गुडॉल 77 चेंडूत 2 चौकारांसह 49, सुने लूस 57 चेंडूत 5 चौकारांसह 36. झुलन गोस्वामी 10 षटकात 4-42, राजेश्वरी गायकवाड 3-37, मानसी जोशी 2-23, हरमनप्रीत कौर 1-1)
भारतीय महिला संघ ः 28.4 षटकात 1-160 (स्मृती मानधना 64 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 80, पूनम राऊत 89 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 62, जेमिमा रॉड्रिग्ज 8. अवांतर 9. शबनीम इस्माईल 6 षटकात 1-46).